Firing at Salman Khan’s house | सलमान खान गोळीबार प्रकरण; मुख्य संशयित आरोपीच्या भावाला घेतले ताब्यात | पुढारी

Firing at Salman Khan's house | सलमान खान गोळीबार प्रकरण; मुख्य संशयित आरोपीच्या भावाला घेतले ताब्यात

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या मुंबईतील वांद्रे येथील घराबाहेर गोळीबाराची घटना १४ एप्रिल रोजी घडली होती. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने संशयित आरोपी विक्की गुप्ता याचा भाऊ सोनू गुप्ता याला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरू आहे. सोनूही या गोळीबार प्रकरणात सहभागी असल्याचा मुंबई पोलिसांना संशय आहे. (Firing at Salman Khan’s house)

संशयित आरोपी सागर पालवर गँगस्टर्सचा प्रभाव होता आणि त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो गँगच्या संपर्कात आला. तिथून त्याला सलमान खानच्या बाहेर गोळीबार करण्याची सुपारी मिळाली होती. हे मोठे काम असून त्यांना याचे चांगले पैसै मिळतील. असे संशयित आरोपींना सांगण्यात आले होते, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

बिहारात शिजला कट

 बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घराजवळील गोळीबार करण्याचा कट बिहारमध्ये शिजला आणि त्यासाठी कुख्यात बिष्णोई टोळीकडून त्यांना चार लाखांची सुपारी देण्यात आली होती, असे दोन्ही शूटर्सच्या चौकशीतून उघडकीस आले आहे. केवळ दहशत निर्माण करण्यासाठी हा गोळीबार करण्यात आला होता. गोळीबारासाठी त्यांना पैसे आणि हत्यार पाठविण्यात आले होते, ते त्यांना कोणी दिले याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. या आरोपींच्या अटकेसाठी आता गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

सलमान खान याच्या घराजवळ झालेल्या गोळीबारानंतर पळून गेलेले शूटर विकीकुमार साहेबसाह गुप्ता आणि सागरकुमार जोगीउडर पाल या दोघांना गुजरातच्या भूज येथून अटक केल्यानंतर पोलीस कोठडीत त्यांची चौकशी सुरु आहे.

दोन्ही आरोपींनी गोळीबाराचा कट बिहारमध्ये शिजल्याचे सांगितले. त्यासाठी दोघांनाही चार लाखांची सुपारी देण्यात आली होती. त्यापैकी एक लाख रुपये त्यांना देण्यात आले होते. उर्वरित तीन लाख रुपये गोळीबारानंतर मिळणार होते. मात्र त्यापूर्वीच ते पकडले गेले आहे.

काही दिवसांपूर्वी त्यांना ऑनलाईन ५० हजार रुपये पाठविण्यात आले होते. ही रक्कम त्यांना कोणी पाठविली हे समजलेले नाही. गोळीबारानंतर या दोघांनाही भूज येथे जाण्याचे आदेश मिळाले होते, त्यामुळे ते दोघेही मुंबईतून गुजरातला पळून गेले. भूजला जाण्यामागे त्यांचा काय उद्देश होता याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

या गुन्ह्यांचा तपासकामी गुन्हे शाखेचे पथक आता भूज, राजस्थान, बिहार आणि दिल्लीला जाणार आहे. बिहारहून मुंबईत आणि पनवेलला गेल्यानंतर कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याचा भाऊ अनमोल बिष्णोई हा दोघांच्या नियमित संपर्कात होता. त्याच्याकडूनच दोघांनाही पुढील सूचना मिळत होत्या असेही त्यांनी सांगितले. (Firing at Salman Khan’s house)

हे ही वाचा :

 

Back to top button