मुंबई : सलमान खानच्या घरावर गोळीबारामागे बिष्णोई टोळीच; संशयिताची पोलिसांकडून चौकशी सुरु | पुढारी

मुंबई : सलमान खानच्या घरावर गोळीबारामागे बिष्णोई टोळीच; संशयिताची पोलिसांकडून चौकशी सुरु

मुंबई : पुढारी वृत्तसेवा – रविवारी पहाटे सिनेअभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ झालेल्या गोळीबारामागे बिष्णोई टोळी असल्याचे आतापर्यंतच्या पोलीस तपासात उघडकीस आले आहे. याच गोळीबारप्रकरणी काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. सलमानला वॉर्निंग देण्यासाठी हा गोळीबार करण्यात आला असून पुढच्या वेळेस थेट टार्गेट करु, अशी धमकीवजा इशारा देण्यात आला आहे.

वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खान हा त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो. रविवारी पहाटे त्याच्या घराजवळ अज्ञात बाईकस्वारांनी हवेत चार ते पाच गोळ्या झाडल्या होत्या. या गोळीबारात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मात्र गोळीबाराच्या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत वांद्रे पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखा आणि एटीएसला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशांनतर पोलिसांनी गोळीबारानंतर पळून गेलेल्या मारेकऱ्याच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती.

रात्री उशिरापर्यंत काही संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून सलमान खानच्या घरााजवळ झालेला गोळीबार बिष्णोई टोळीनेच केल्याचे उघडकीस आले आहे. गोळीबार करणार्‍या दोन्ही शूटर्सची ओळख पटली आहे. विष्णोई टोळीचा राजस्थानमधील हस्तक रोहित गोदराने यानेच संबंधित दोन्ही शूटर्सला सलमानच्या घराजवळ गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. ही पहिली आणि शेवटची वॉर्निंग होती, पुन्हा खेटलास तर थेट टार्गेट करु अशी धमकीच विष्णोईचा भाऊ अनमोल याने अमेरिकेतून पाठविलेल्या फेसबुकवरुन दिली आहे.

Back to top button