श्रीमद् रामायण : सीता हरण प्रसंगात साधूच्या भूमिकेसाठी निकितीन धीरने अशी केली तयारी | पुढारी

श्रीमद् रामायण : सीता हरण प्रसंगात साधूच्या भूमिकेसाठी निकितीन धीरने अशी केली तयारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘श्रीमद् रामायण’ या मालिकेत विशद होणारे प्रभू श्रीरामाचे चरित्र पाहताना प्रेक्षक तल्लीन होत आहेत. आतापर्यंत प्रेक्षकांनी पाहिले की, दानवराज रावणाने सीतेचे अपहरण कसे केले आणि सीतेच्या रक्षणार्थ जटायूने रावणाशी कसा संघर्ष केला. दुसरीकडे श्रीराम आणि लक्ष्मण यांनी सीतेचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे आणि रस्त्यात त्यांना सीतेची आभूषणे सापडतात, ज्यावरून सीता कोणत्या दिशेने गेली असेल याचा अंदाज त्यांना येतो आणि त्यातच त्यांना समजते की सीतेचे अपहरण करण्यात आले आहे.

सीतेचे अपहरण तिची फसवणूक करून करण्यात आले आहे. वनवासात असताना राम, लक्ष्मण आणि सीता ज्या पर्णकुटीत वास्तव्य करून असतात, तेथे रावण साधूच्या वेषात येतो. सीतेचा कनवाळू स्वभाव आणि दारी आलेल्या अतिथीचा सत्कार करण्याची तिची भावना ओळखून रावण तिचा फायदा घेतो आणि तिला संभाषणात गुंतवून भिक्षा झोळीत घालण्यासाठी लक्ष्मणाने आखलेल्या रेषेच्या बाहेर पाऊल टाकण्यास भाग पाडतो. बलशाली दानवराज रावणाची भूमिका करत असलेल्या निकितीन धीर या अभिनेत्याला साधूच्या रूपात प्रस्तुत होण्यासाठी उग्र भाव घालवून आपली मुद्रा सौम्य करण्याची काळजी घ्यावी लागली.

या कथानकाविषयी सविस्तर बोलताना निकितीन धीर म्हणाला, “एक अभिनेता म्हणून रावणाच्या व्यक्तिमत्त्वातील जटिलता आणि खोली मला आकर्षित करते. रावणाच्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध अशा साधूचे रूप धारण करण्यासाठी मला काही तयारी करावी लागली. चेहऱ्यावरचे उग्र भाव कमी करावे लागले आणि सीता मातेचा विश्वास संपादन करण्यासाठी चेहऱ्यावर एक शांत भाव आणावा लागला. हे रूप धारण करण्याअगोदर मी मन शांत केले, आवाजाचा टोन बदलला आणि सौम्य भाव चेहऱ्यावर आणण्याचा प्रयत्न केला. मी साकारत असलेली रावणाची भूमिका ही केवळ प्रेक्षकांचे लक्ष वेधणारीच नाही, तर त्यांना आत्मपरीक्षण करण्यास भाग पडणारी, नैतिकता, नियती आणि सुष्ट व दुष्ट यांच्यातील संघर्षाची जाणीव देणारी असली पाहिजे.

‘श्रीमद् रामायण’ सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर पाहता येईल.

Back to top button