Constable Manju : रावडी सत्या आणि भित्री कॉन्स्टेबल मंजूची नवीन मालिका आजपासून | पुढारी

Constable Manju : रावडी सत्या आणि भित्री कॉन्स्टेबल मंजूची नवीन मालिका आजपासून

पुढारी ऑनलाईन डेस्क : एका प्रसिद्ध राजकारण्याचा बिनधास्त, निडर कार्यकारी तर एक भित्री भागुबाई पोलिस यांचं प्रेमाचं, लग्नाचं गणित जुळलं तर कसं वाटेल? कल्पना तरी होणं शक्य आहे का? (Constable Manju) अर्थात, नाही पण देवा ब्राह्मणाच्या साक्षीने या जोडीची लग्नगाठ बांधली जाणार, अशी ही अनोखी कथा घेऊन ‘कॉन्स्टेबल मंजू’ ही नवीन मालिका १८ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (Constable Manju)’कॉन्स्टेबल मंजू’ मालिकेच्या निमित्ताने साताऱ्यामध्ये एक छोटाशा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात साताऱ्यातील महिला कॉन्स्टेबल यांनी त्यांची विशेष उपस्थिती दर्शवली होती. ‘कॉन्स्टेबल मंजू’ मालिकेतील मंजू उर्फ अभिनेत्री मंजिरी वाघमारे हिच्या हस्ते उपस्थित सर्व कॉन्स्टेबल महिलांचा सत्कार करण्यात आला.

मंजिरी वाघमारे उर्फ मंजू ही तिच्या ‘वाघमारे’ या आडनावाप्रमाणे बिलकुल धाडसी नाही. मंजू ही जवळजवळ प्रत्येकाला आणि प्रत्येक गोष्टीला घाबरते. कोणीही मोठ्याने बोलताना ऐकल्यावर सुद्धा ती घाबरते आणि त्यामुळे तिच्याकडून चुका होतात.

खरंतर तिला पोलीस बनण्यात अजिबात रस नव्हता. पण परिस्थिती अशी होती की, तिला नाईलाजास्तव पोलीस दलात भरती व्हावे लागले. ‘शी इज गुड फॉर नथिंग’, हेच तिला नेहमी घरात आणि पोलीस स्टेशनमध्ये बोलले जाते. त्यामुळे, मंजुला ही ती निरुपयोगी आहे असे वाटू लागले पण आत्मविश्वास गमावलेल्या मंजूच्या आयुष्यात अचानक हिरोची म्हणजेच सत्याची एन्ट्री होते.

आता भित्री मंजू आणि निडर सत्या लग्नाच्या बंधनात सामान्य वैवाहिक आयुष्य जगतील का? दोघांचं एकमेकांसोबत जमेल का? सत्याच्या सहवासात राहून मंजूच्या स्वभावात बदल घडून ती धाडसी होईल का? आत्मविश्वास गमावलेली मंजू या नव्या नात्यामुळे स्वतंत्र होऊन स्वतःची ओळख निर्माण करेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना या मालिकेतून नक्की मिळतील.

संदीप जाधव निर्मित ‘कॉन्स्टेबल मंजू’ या मालिकेत मोनिका राठी हिने मंजुची आणि वैभव कदम यांनी सत्याची भूमिका साकारली आहे. या मालिकेचे संवाद तेजपाल वाघ यांनी लिहिले असून स्वप्नील गांगुर्डे यांनी कथा, पटकथा लिहिली आहे. भिन्न स्वभावाची ही अनोखी प्रेम कहाणी नक्की पाहा सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता सन मराठी वाहिनीवर पाहता येईल.

Back to top button