पुढारी ऑनलाईन डेस्क : झी मराठी लवकरच एक अशी गोष्ट घेऊन येत आहे, ज्यात स्त्री आणि एका आईच संसारात काय महत्व आहे, त्याची जाणीव तुम्हाला करून देईल. घरात स्त्री नसलेल्या कुटुंबात शाश्वत विकासाचा विचार करणे कठीण आहे. स्त्रीच्या आयुष्यात अनेक भूमिका आहेत. त्यामुळे त्यांना सुपर वुमन म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत वसुंधराची भूमिका साकारत असलेल्या 'अक्षया हिंदळकर' हिने सांगितले की, खऱ्या आयुष्यात ती आई नसूनही ती आईपण शिकली आहे.
"मी कुठे तरी ऐकलं आहे की, अर्धनारी नटेश्वराचं जे रूप आहे, त्या रूपात स्त्रीला खूप महत्व आहे. म्हणजे जस एका देवाचं पूर्णत्व स्त्री शिवाय होत नाही तसंच संसारात तिच्या शिवाय तो असूच शकत नाही. मला कायम असं वाटतं की, आई होणं हे खूप मोठं सौभाग्य आहे आणि आईची भूमिका स्वीकारणं किंवा निभावणं ही पण एक वेगळी जबाबदारी आहे. माझ्या घरी माझ्या मामाचा मुलगा जो माझा लहान भाऊ आहे, तो अशा काळात माझ्या आयुष्यात आला, जेव्हा काही गोष्टी माझ्या आयुष्यातल्या बिथरल्या होत्या. पण त्याच्या येण्याने सगळं छान झालं होतं. मी त्याची ताई कमी आणि आई जास्त आहे. त्याच्यासाठी खऱ्या जीवनात आईची भूमिका निभावल्यामुळे इथे मला आई साकारायला मदत झाली.
माझ्या आईकडे आम्ही कोणतेही प्रश्न घेऊन गेलो की, त्याची उत्तरे किंवा उपाय नेहमी तिच्याकडे तयार असतात. तिच्याकडून मी खूप शिकले आहे. मलाही वाटतं की, आईची जागा जगात कोणीही घेऊ शकत नाही. 'पुन्हा कर्तव्य आहे' मध्ये वसुंधराच्या भूमिकेसाठी माझी आई आणि आजी माझा गृहपाठ होत्या. स्त्रीकडे जी ममता असते ती जन्मतः तिच्याकडे असते. तर तिथे मला थोडीशी मदत झाली, फक्त जे आई सारखं वागणं असतं तिथे मला मेहनत घ्यावी लागते.
'पुन्हा कर्तव्य आहे' मध्ये माझ्या आईची ज्या भूमिका साकारत आहेत, त्या इतक्या गोड आहेत की, मी त्यांना बघून काही गोष्टी शिकतेय. आमचे दिग्दर्शक शैलेश सर इतक्या उत्तमपणे समजावतात की, मला एका नवीन दृष्टिकोनातून आईपण समजतंय. मला पूर्ण विश्वास आहे की तुम्हाला ही गोष्ट खूप आवडेल.