मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन : अंकुश चौधरी सुपर जजच्या भूमिकेत | पुढारी

मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन : अंकुश चौधरी सुपर जजच्या भूमिकेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : धमाकेदार डान्स रिअ‍ॅलिटी शो ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’ स्टार प्रवाहवर ९ मार्चपासून सुरू होत आहे. या आधीच्या दोन्ही पर्वांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिलाय. त्यामुळे नव्या पर्वाची उत्सुकता आहे. यंदाच्या पर्वाचं वेगळेपण म्हणजे स्पर्धक जोडीने नृत्य सादर करणार आहेत. आई-मुलगी, गुरु-शिष्य, मामा-भाचे, बहिणी-बहिणी अशी अनेक नाती आणि त्यांची नृत्यकला या मंचावर पहाता येणार आहे. त्यामुळे या पर्वात मंचावर नृत्यासोबतच नात्यांमधली गंमतही अनुभवता येईल.

अंकुश चौधरी मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन या कार्यक्रमाच्या सुपर जजची जबाबदारी पार पाडणार आहे. लोकप्रिय अभिनेत्री समृद्धी केळकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर आणि हिंदी-मराठी रिअॅलिटी शो गाजवणारा नृत्यदिग्दर्शक वैभव घुगे या कार्यक्रमाचे कॅप्टन आहेत.

अंकुश चौधरी म्हणाला, ‘मी होणार सुपरस्टारचं प्रत्येक पर्व हे वेगळेपण घेऊन येतं. यावेळेच्या पर्वात जोड्यांची धमाल अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे फक्त नृत्यच नाही तर या मंचावर नात्यांचाही खऱ्या अर्थाने सोहळा होईल. पहिल्या दोन्ही पर्वांना भरभरुन प्रेम मिळालं. दोन्ही पर्वातल्या स्पर्धकांच्या मी अजूनही संपर्कात आहे. त्यामुळे या मंचाने मला नवा परिवार दिलाय असं म्हणू शकतो. या पर्वातही नवनव्या स्पर्धकांना भेटण्यासाठी मी उत्सुक आहे.’ मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन ९ मार्चपासून दर शनिवार रविवार रात्री ९ वाजता स्टार प्रवाहवर पाहता येईल.

Back to top button