पुढारी ऑनलाईन डेस्क : सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील पश्या म्हणजेच लोकप्रिय अभिनेता आकाश नलावडे आणि प्रसिद्ध अभिनेत्री शिवानी बावकर (Shivani Baokar- लागीरं झालं जी फेम शीतली ) नव्या रुपात दिसणार आहेत. स्टार प्रवाह नवी मालिका साधी माणसं घेऊन येत आहे. जगात चांगली आपली सांगली असं आत्मविश्वासाने मिरवणाऱ्या सांगली शहरात या मालिकेची गोष्ट घडते. मीरा आणि सत्या या गोष्टीतली दोन मुख्य पात्र. एकाच गावात राहत असले तरी स्वभाव मात्र टोकाचे. मीरा स्वभावाने अतिशय सकारात्मक, सहनशील आणि संपूर्ण कुटुंबाचा विचार करणारी. घरची परिस्थिती बेताची असली तरी हेही दिवस सरतील असा आत्मविश्वास बाळगणारी. तर सत्या आणि नशिबाचा ३६ चा आकडा आहे. (Shivani Baokar)
संबंधित बातम्या –
डॉक्टर व्हायचं त्याचं स्वप्न होतं पण गॅरेजमध्ये मेकॅनिकचं काम करतो. स्वत:च्या धुंदीत रहाणारा. अशा या विभिन्न स्वभावाच्या मीरा आणि सत्यामध्ये नियती नेमका कोणता खेळ करणार याची गोष्ट म्हणजे साधी माणसं ही मालिका.
अभिनेता आकाश नलावडे ही नवी भूमिका साकरण्यासाठी खूपच उत्सुक आहे. पश्या या माझ्या भूमिकेला खूप प्रेम मिळालं. या भूमिकेने मला घराघरात पोहोचवलं. तेच प्रेम सत्यालाही मिळेल ही अपेक्षा आहे. या मालिकेतला माझा लूकही खूप वेगळा आहे. साध्या माणसांची ही गोष्ट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, असं आकाश म्हणाला.
प्रसिद्ध अभिनेत्री शिवानी बावकर आणि सहकुटुंब सहपरिवार या मालिकेतून घराघरात पोहोचलेला पश्या म्हणजेच आकाश नलावडे या मालिकेत मीरा आणि सत्याची भूमिका साकारणार आहेत. स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती रणजीत ठाकूर आणि हेमंत रुपारेल यांच्या फ्रेम्स प्रोडक्शनची आहे. अजय कुरणे या मालिकेचं दिग्दर्शन करणार असून अनेक दिग्गज कलाकार मालिकेतून भेटीला येतील.