थलपती विजय @’मिशन 2026′!, जाणून घ्‍या तामिळनाडूतील बदलते राजकीय ‘रंग’

अभिनेता थलपती विजय (संग्रहित छायाचित्र)
अभिनेता थलपती विजय (संग्रहित छायाचित्र)

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भावनांचा प्रचंड कल्‍लोळ, याला भडक डॉयलॉगबाजीची भक्‍कम साथ हे कमी म्‍हणून की काय या सर्वांना अविश्‍वसनीय स्‍टंटबाजीची जोड हे सारंकाही आपणं साऊथच्‍या (दाक्षिणात्‍य) चित्रपटांमध्‍ये पाहतो. पडद्यावर दाखवलं जाणारं सारं काही खोटं आणि अभासी आहे, हे माहित असूनही तेथील चाहते चित्रपट नायक आणि नायिकांना देवत्व बहाल करतात. भल्‍याभल्‍या सेलिब्रिटींना हेवा वाटावा, अशी लोकप्रियता हे स्‍टार अनुभवतात. हीच लोकप्रियता काहींसाठी राजकारणातील यशाचा मार्ग दाखविणारी चावी ठरते. हाच अनुभव गाठीशी बांधत नुकतीच प्रसिद्ध तमिळ अभिनेता थलपती विजय याने शुक्रवारी 'तमिलगा वेत्री कळघम' या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. आपला पक्ष तामिळनाडूत २०२६ मध्‍ये होणारी विधानसभा निवडणूक लढविणार असल्‍याचेही त्‍याने जाहीर केले आहे. जयललिता यांच्‍या निधनानंतर तामिळनाडू निर्माण झालेली राजकीय पोकळी थलपती विजय भरु शकेल का, यावर आतापासूनच राजकीय वर्तुळात खल सुरु झाला आहे. ( Thalapathy Vijay Will bring a change in Tamil Nadu politics? )

दिग्‍गज कलाकार आणि तामिळनाडूचे राजकारण

एमजी रामचंद्रन (एमजीआर), के करुणानिधी, जे जयललिता, विजयकांत, कमल हासन अशा दिग्‍गज कलाकारांनी राजकारणात प्रवेश केला. यातील एमजी रामचंद्रन (एमजीआर), के करुणानिधी, जे जयललिता, विजयकांत यांनी सत्तेची चव चाखली. याला अपवाद ठरले दाक्षिणात्‍य सुपरस्‍टार रजनीकांत. कारण त्‍यांनी राजकीय पक्षाची घोषणा केली होती. मात्र २०२० मध्‍ये त्‍यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकारणातून माघार घेतली होती. तामिळनाडूचे राजकारण आणि कलाकार असे एक समीकरणच आहे. आता यामध्‍ये थलपती विजय याच्‍या नावाची भर पडली आहे.

विजयकांत आणि कमल हासन यांसारख्या अनेक स्टार्सनी यापूर्वी तामिळ राजकारणात प्रवेश केला होता. परंतु त्यापैकी कोणीही कोणतेही महत्त्वपूर्ण बदल करू शकले नाहीत. तामिळनाडूतील जनतेने कमल हसन यांना नाकारल्‍याचा इतिहास ताजा आहे. तसेच रजनीकांत यांनीही राजकारणापासून अलिप्‍त राहण्‍याचा निर्णयही आजही राजकीय चर्चेचा विषय ठरतो.

तामिळनाडूतील राजकारणातील नवा पर्याय

सध्‍या तामिळनाडूच्‍या राजकारणात प्रस्‍थापित द्रमुक आणि अण्‍णाद्रमुक पक्षांचा बोलबाला आहे. तरीही राज्‍याच्‍या दोन्‍ही पक्षांना सत्तेसाठीचा संघर्ष मोठा आहे. ४९ वर्षीय थलपथी विजय यांचा जगभरात चाहता वर्ग मोठा आहे. त्‍यांनी तामिळनाडूच्‍या राजकारणात एन्‍ट्री ही प्रस्‍थापित राजकीय पक्ष द्रमुक आणि अण्‍णाद्रमुक पक्षाला विचार करायला लावणारी ठरणार आहे. विजयच्‍या चाहत्‍यांमध्‍ये तरुणाईची संख्‍या मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच द्रविडीयन राजकारणाचा त्‍यांचा अभ्‍यास आहे. अशावेळी थलपती विजय यांची राजकीय एन्‍ट्री मतदारांसाठी एक नवा पर्याय आहे, असे त्‍यांचे चाहते मानतात. ( Thalapathy Vijay Will bring a change in Tamil Nadu politics? )

फॅन ग्रुपच्‍या माध्‍यमातून पायाभूत सुविधा उभारल्‍या

विजय थलपती याची राजकारणातील एन्‍ट्री अचानक झालेली नाही. त्‍यासाठी तो गेली दहा वर्ष मेहनत घेत आहे. म्हणूनच त्याने आपल्‍या फॅन ग्रुपचे नाव 'विजय मक्कल इयेक्कम' असे ठेवले. तामिळ भाषेत मक्कल म्हणजे लोक. "माझा चाहतावर्ग हा केवळ चित्रपटांचा चाहता नाही तर तो जनतेचेही प्रतिनिधित्‍व करणारा वर्ग आहे," असे संदेश देण्‍याचा त्‍याचा प्रयत्‍न होता. विजय मक्कल इयेक्कम या फॅन क्‍लबच्‍या माध्‍यमातून त्‍याने पायाभूत सुविधांच्‍या कार्यात आघाडी घेतली आहे. या वर्षी जानेवारीमध्ये तामिळनाडूतील पुरग्रस्‍तांच्‍या मदतीला तो धावला होता. पूरग्रस्त तिरुनेलवेली जिल्ह्यात सुमारे 1,500 लोकांसाठी त्यांनी स्वतः मदत साहित्य वाहून नेले होते. ( Actor Vijay Will bring a change in Tamil Nadu politics? )

Thalapathy Vijay : विधानसभा २०२६ मिशन सुरु

थलपती विजय याने शुक्रवार, २ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रसिद्‍ध केलेल्‍या निवदेनात स्‍पष्‍ट केले की, "आगामी २०२६ च्या विधानसभा निवडणुका लढणे आणि जिंकणे. तसेच लोकांना हवे असलेले मूलभूत राजकीय बदल घडवून आणणे हेच आपले ध्येय आहे". विशेष म्‍हणजे, आगामी २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवणार नाही किंवा कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही, असेही त्‍याने स्‍पष्‍ट करत आपली राजकीय भूमिका तटस्‍थ असल्‍याचेही जाहीर केली आहे. ( Thalapathy Vijay Will bring a change in Tamil Nadu politics? )

राजकारण हा माझ्‍यासाठी छंद नाही…

"राजकारण हे माझ्यासाठी दुसरे करिअर नाही. हे एक पवित्र लोकांचे कार्य आहे. मी खूप दिवसांपासून त्यासाठी स्वतःला तयार करत आहे. राजकारण हा माझा छंद नाही. मला या क्षेत्रात पूर्ण समर्पित वृत्तीने कार्य करायचे आहे, असेही त्‍याने म्‍हटलं आहे. तसेच राजकारणाला पूर्ण वेळ देण्‍यासाठी आगामी दोन चित्रपटाचे चित्रीकरण झाल्‍यानंतर चित्रपटातील काम थांबविणार असल्‍याचेही विजयने म्‍हटले आहे.

२३४ मतदारसंघांपैकी १५६ मतदारसंघात बूथ कमिट्या स्‍थापन

तामिळनाडूच्या २३४ मतदारसंघांपैकी १५६ मतदारसंघात बूथ कमिट्या स्‍थापन केल्‍या आहेत. आता तामिळनाडूच्‍या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम्‍ही सज्‍ज आहोत, असे थलपती विजय यांच्‍या राजकीय टीममधील सदस्‍य सांगतात. याची तयारी मागील वर्षभरापासूनच सुरु झाली आहे. मागील वर्षभरात 'विजय मक्कल इयेक्कम'च्‍या माध्‍यमातून पेरियार, के कामराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अनेक कल्याणकारी योजना राबविण्‍यात आल्‍या आहते. संपूर्ण तामिळनाडूमध्ये सायंकाळचे शिकवणी वर्ग, नेत्रदान, रक्तदान उपक्रम आणि मोफत नाश्ता सुरु करण्‍यात आले आहेत. अभिनेता विजय याचा चाहता वर्गच त्‍याच्‍या पक्षाचा मूळ कार्यकर्ता असेल, असे एक दीर्घकालीन धोरही राबविण्‍याबाबत विचार सुरु असल्‍याचेही सांगितले जात आहे. त्‍यामुळे अभिनेता विजय हा तामिळनाडूच्‍या राजकारणात पर्यायी शक्‍ती नव्‍हे तर सत्ता काबीज करणारा नेता अशी स्‍वत:ची प्रतिमा तयार करण्‍याच्‍या तयारीत असल्‍याचे राजकीय विश्‍लेषक मानतात. ( Thalapathy Vijay Will bring a change in Tamil Nadu politics? )

Thalapathy Vijay : राजकीय पोकळी थलपती विजय भरुन काढणार?

तामिळनाडूमध्‍ये अण्‍णाद्रमुक पक्षाच्‍या सर्वेसर्वा जयललिता यांच्‍या निधनानंतर द्रमुकचे नेते स्‍टॅलिन यांना जनतेने पसंती दिली. मात्र मागील काही महिन्‍यात द्रमुक पक्षाला विरोधच नाही, असे चित्र आहे. अशा परिस्‍थितीत एक भूमिपूत्र अभिनेता अशी ओळख असणारा थलपती विजयला अल्‍पवधीत राजकारणात मोठी मजल मारण्‍याची संधी आहे. असा विश्‍वास त्‍याचे चाहते व्‍यक्‍त करत आहेत. तामिळनाडूतील सत्तेत असलेल्‍या द्रमुकला जनतेने सलग दोनवेळा आतापर्यंत कधीच निवडून दिलेले नाही. अशातच जयललिता यांच्‍या निधनानंतर अण्‍णाद्रमुक पक्षाला गटबाजीचे ग्रहण लागले आहे. त्‍यामुळे थलपती विजय याला तामिळनाडूच्‍या राजकारणात मोठी संधी असल्‍याचे मानले जात आहे.

बालकलाकार ते साऊथ सुपरस्‍टार

विजय हा १९८४ मध्‍ये बालकलाकार म्‍हणून तामिळ चित्रपटसृष्‍टीत आला. ९० च्‍या दशकात तो थलापती म्‍हणून ओळखला जावू लागला. २०१७ मध्ये विजय आणि दिग्दर्शक ऍटली यांनी त्‍याचे नाव थलपती (कमांडर) असे नाव बदलले. नव्‍या नावाची घोषणा 'मेर्सल' च्या पोस्टरद्वारे करण्यात आली होती. विशेष म्‍हणजे २०१६ मध्‍ये अण्‍णाद्रमुकच्‍या सर्वेसर्वा जयललिता यांच्‍या निधनानंतर काही दिवसांनी विजयचे थलपती हे पोस्‍टर झळकले होते. त्याच्‍या चाहत्‍यांनी एका उत्सवासारखा हा क्षण साजरा केला होता.

Thalapathy Vijay : योग्‍यवेळी घेतलेला योग्‍य निर्णय…

तामिळनाडूतील राजकीय विश्‍लेषकांच्‍या मते, विजय हा तामिळनाडू चित्रपटसृष्‍टीतील एक जागतिक सुपरस्टार ब्रँड आहे.
त्‍याच्‍या लोकप्रियतेची तुलना तामिळनाडूचे पहिले सुपरस्‍टार एमजीआर आणि रजनीकांत अशा अभिनेत्‍याच्‍या लोकप्रियतेबरोबर केली जाते. त्‍याने आतापर्यंत ३६ सुपरहिट चित्रपट दिले आहे. देशातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक अशीही त्‍याची ओळख आहे. आता लोकप्रियेतच्‍या शिखरावर असताना त्‍याने राजकारणात प्रवेश करणार असल्‍याचे जाहीर केले आहे. रजनीकांत यांनी 1996 मध्ये राजकारणात पदार्पण केले असते तर थेट मुख्यमंत्री झाले असते, मात्र त्‍यांनी राजकारणात येण्‍याच निर्णय उशीरा घेतला त्‍यामुळे त्‍यांना राजकीय यशापासून वंचित रहावे लागले, असे मानले जाते. त्‍यामुळेच थलपती विजय याने योग्‍यवेळी घेतला निर्णय त्‍याला मोठे राजकीय यश मिळवून देईल, असा विश्‍वास त्‍याचे चाहते व्‍यक्‍त करत आहेत. मात्र थलपती विजय तामिळनाडूतील राजकीय रंग बदलण्‍यात यशस्‍वी होणार का, यासाठी राज्‍यातील जनतेसह देशातील त्‍याच्‍या चाहत्‍यांना २०२६ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news