Cervical Cancer : जाणून घ्या सर्व्हायकल कॅन्सरची कारणे, लक्षणे व उपचार | पुढारी

Cervical Cancer : जाणून घ्या सर्व्हायकल कॅन्सरची कारणे, लक्षणे व उपचार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेचे (Poonam Pandey ) गर्भाशय मुखाच्या कॅन्सरमुळे ( Cervical Cancer सर्व्हायकल कॅन्सर) निधन झाल्याचे वृत्त समोर आले आणि एकच खळबळ उडाली. पण तिने शनिवारी (दि.३) आपण जिवंत असल्याचे सोशल मिडियावर स्पष्ट केले. पण तिच्या निधनानंतर  गर्भाशय मुखाचा कॅन्सर ( Cervical Cancer सर्व्हायकल कॅन्सर) चर्चेत आला. तुम्हाला माहित आहे का? गर्भाशय मुखाचा कॅन्सरला (Cervical Cancer ) कोणते घटक कारणीभूत असतात, त्याची लक्षणे आणि तो होवू नये म्हणून काय खबरदारी घ्यावी. “गर्भाशय मुखाचा कॅन्सर म्हणजे काय? त्याची लक्षणे, उपाय” हे आपण आज पाहू.

Cervical Cancer : वेळीच प्रतिबंध करता येऊ शकते

अलिकडच्या दशकाचा विचार करता गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचे  (Cervical Cancer) प्रमाण वाढत असल्याचे विविध अभ्यासात समोर आले आहे. नुकतंच अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिचे गर्भाशय मुखाच्या कॅन्सरने निधन झाल्याचे समोर आले आहे. आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे  गर्भाशय मुखाचा कॅन्सरला (Cervical Cancer ) कोणते घटक कारणीभूत असतात, त्याची लक्षणे आणि तो होवू नये म्हणून काय खबरदारी घ्यावी हे समजून घेवूया.

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग ‘ह्युमन पेपिलोमा’ नावाच्या विषाणूमुळे होतो. या कर्करोगाचे निदान सुरुवातीच्या काळात करणे कठीण असते. पण सुरुवातीच्या काळात उपचार झाल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो. सर्व्हिक्स किंवा ग्रीवा म्हणजे काय? तर गर्भाशय आणि योनीमार्गाला जोडणारा भाग होय. हा भाग गर्भाशयाच्या खालच्या बाजूस असलेल्या योनीमार्गात उघडतो. स्त्रियांना याच ठिकाणी गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होतो. ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV)चे अनेक स्ट्रेन असतात. यातील काही स्ट्रेन घातक आहेत. याचा संसर्ग झाल्यास गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. पण ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV)चा संसर्ग झालेल्या प्रत्येकालाच कॅन्सर होतो, असे नाही. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, त्यांना त्रास होण्याची शक्यता असते. नियमित तपासणी आणि पॅप स्मिअर चाचणी केल्याने हा आजार पुर्ण बरा होवू शकतो.

Cervical Cancer : ‘हे’ आहेत कारणीभूत घटक

 • असुरक्षित लैंगिक संभोग हे गर्भाशय मुखाचा कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरणार्‍या घटकांपैकी एक आहे. एकापेक्षा जास्त लैंगिक भागीदार असणे किंवा अकाली लैंगिकद़ृष्ट्या सक्रिय होणे गर्भाशयाच्या मुख्याच्या कर्करोगास कारणीभूत ठरते.
 • अनेक तरुण स्त्रियांचे एचपीव्हीसाठी (HPV) नियमित तपासणी किंवा लसीकरण नसते. ज्यामुळे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो.
 • धूम्रपान आणि चुकीची आहारपद्धती.
 • कमी वयात लग्‍न होणे/लैंगिक संबंध असणे त्याचबरोबर कमी वयात पहिले मूल होणे (विशेषत: 16 व्या वर्षाआधी)
 • पोषक तत्त्वे आणि जीवनसत्त्वांची कमतरता असणे.
 • गुप्तांगांची योग्य स्वच्छता न ठेवणे.
 • विविध प्रकारच्या संतती नियमनाच्या गोळ्या घेणे.

 गर्भाशय मुखाच्या कॅन्सरची लक्षणे

 • साधारणपणे कर्करोग हा सुरुवातीच्या टप्प्यात लक्षात येत नाही.
 •  मासिक पाळीदरम्यान, रजोनिवृत्तीनंतर किंवा लैंगिक संभोगानंतर होणारा रक्तस्राव याकडे बऱ्याच स्त्रिया किरकोळ शारीरीक समस्या म्हणून दुर्लक्ष करतात; परंतु हे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे  प्रारंभिक लक्षण असू शकते.
 • इतर लक्षणांचा विचार केला तर, ओटीपोटात होणार्‍या वेदना किंवा संभोगादरम्यान होणार्‍या वेदना यांचा समावेश होतो.
 • परंतु इतर काही लक्षणांमध्ये रक्‍तस्राव होणे, पांढर्‍या रंगाचं पाणी जाणे, संबंधानंतर ओटीपोटात दुखणे या समस्या उद्भवतात.
 • जर हा कर्करोग जास्त बळावला असेल तर त्यावेळी भूक न लागणे, वजन कमी होणे कंबर, पाय तसेच ओटीपोट दुखणे या तक्रारी येतात.
 • या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते.

कर्करोग कसा टाळावा?

 गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचे निदान झाल्यानंतर तो कोणत्या स्टेजला आहे यावर अवलंबुन असते की कोणती उपचारपद्धत अंमलात आणावी. सर्वसाधारणपणे पुढील प्रमाणे उपचार घेणे गरजेचे असते.

 • कर्करोगाच्या प्रथम टप्प्यात छोट्या शस्त्रक्रिया केल्या जातात. परिस्थितीनुसार गर्भाशय काढून टाकणे किंवा योनीमार्गाचा वरचा भाग काढण्यात येतो.
 • गरजेनूसार शस्त्रक्रिया टाळून रेडिओथेरेपीचा वापर केला जातो.
 • एचपीव्ही (HPV) लसीकरण गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी फायदेशीर ठरते. नियमित तपासणी, वेळीच निदान आणि उपचारांसाठी महत्त्वपूर्ण ठरते.
 • धूम्रपान न करणे त्याचबरोबर सुरक्षित लैंगिक संभोग ठेवणे, निरोगी जीवनशैली राखणे.
 • नियमीत व्यायाम करणे, आपले वजन नियंत्रित ठेवणे.
 • त्याचबरोबर आपल्या लैंगिक आरोग्याबाबत जागरुकता बाळगणे, असामान्य लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकिय सल्ला घेणे.

हेही वाचा 

Back to top button