बॉलीवूडपटांच्या कमाईचा नवा उच्चांक! | पुढारी

बॉलीवूडपटांच्या कमाईचा नवा उच्चांक!

राजेंद्र जोशी

मुंबई : देशाचे अर्थकारण, उत्पादकता, विमान, रेल्वेने प्रवास करणारी प्रवासी संख्या यांचा आलेख कोरोनापूर्व काळातील आलेखाच्या सीमा ओलांडून पुढे झेपावला आहे. आता बॉलीवूडच्या बॉक्स ऑफिसवरील गल्ल्यानेही 2023 मध्ये नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. यामध्ये सुमारे 1 हजार 100 कोटी रुपयांचा अतिरिक्त गल्ला जमा झाला असून, बॉलीवूडच्या लोकप्रिय सिनेमांच्या गल्ल्याने आता 12 हजार 100 कोटी रुपयांची सीमा ओलांडली आहे.

शाहरूख खानचा ‘जवान’ आणि ‘पठाण’, सनी देओलचा ‘गदर-2’, आणि रणबीर कपूर याची प्रमुख भूमिका असलेला ‘अ‍ॅनिमल’ या चार चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर 500 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमा केला. यामध्ये ‘जवान’ने 10 डिसेंबरपर्यंत 640 कोटी 42 लाख रुपयांचा गल्ला जमा केला होता. त्यापाठोपाठ ‘पठाण’नेही 543 कोटी 22 लाखांची कमाई केली. सनी देओलचा ‘गदर-2’ या सिनेमाने 525 कोटी 50 लाखांचा गल्ला जमवला आहे. ‘अ‍ॅनिमल’ या सिनेमाने 10 डिसेंबरपर्यंत 432 कोटी रुपयांचा गल्ला गोळा केल्याची नोंद असली, तरी वर्षाअखेरीस तोही 500 कोटींची सीमा ओलांडेल, असा अंदाज आहे. यापाठोपाठ अन्य चित्रपटांमध्ये ‘टायगर-3’ (282 कोटी), ‘केरळा स्टोरी’ (238 कोटी), ‘रॉकी और राणी की प्रेम कहानी’ (153 कोटी), आणि ‘ओमेगा-2’ (150 कोटी रुपये) या हिट्ट चित्रपटांचा समावेश आहे. भारतीय सिनेमात बॉलीवूड चित्रपटांच्या या उच्चांकी गल्ल्याला दोन प्रमुख कारणे समजली जातात. यामध्ये प्रथमच 500 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमविणार्‍या चित्रपटांची संख्या वाढली आहे. शिवाय, गतवर्षाच्या अखेरीस प्रदर्शित झालेल्या ‘अवतार’ चित्रपटाच्या यंदा 390 कोटी रुपयांच्या गल्ल्याचाही यामध्ये समावेश आहे.

कोरोनापूर्व काळात म्हणजे 2019 साली बॉलीवूडच्या चित्रपटांच्या गल्ल्याने 11 हजार कोटी रुपयांचा उच्चांक नोंदविला होता. 2022 मध्ये कोरोनाचे मळभ दूर झाले; तरी कोरोनापूर्व काळाची पायरी गाठता आली नाही. गतवर्षात हा एकत्रित गल्ला 10 हजार 600 कोटी रुपयांचा असल्याचे सिने इंडस्ट्रीजच्या वर्तुळाचे वृत्त आहे. चालूवर्षी मात्र हा गल्ला नव्या उच्चांकावर झेपावला असला, तरी प्रेक्षक संख्येमध्ये मात्र कोरोनापूर्व काळाच्या तुलनेत अद्यापही पाच टक्क्यांची घट आहे.

Back to top button