

बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा (Preity Zinta) हिने वयाच्या ४६ व्या वर्षी गुड न्यूज दिलीय. प्रिती जुळ्या मुलांची आई बनलीय. जीवनातील सर्वांत आनंदाची ही बातमी तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केलीय. प्रितीने केलेल्या पोस्टमधून दोन मुलांची नावेदेखील चाहत्यांना सांगितली आहेत. प्रितीने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर आपल्या फोटोसोबत एक नोट शेअर करत गुड न्यूज दिलीय.
"मला आज तुम्हा सर्वांसोबत आश्चर्यकारक बातमी शेअर करायची आहे. मी आणि जीन खूप आनंदी आहोत आणि आमचे हृदय खूप कृतज्ञतेने आणि प्रेमाने भरून गेले आहे. कारण आम्ही आमच्या कुटुंबात जुळ्या मुलांचे स्वागत करतो." असे प्रितीने (Preity Zinta) इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे. तिने जुळ्या मुलांची नावे Jai Zinta Goodenough आणि Gia Zinta Goodenough अशी ठेवली आहेत. आम्ही आमच्या आयुष्यातील या नवीन टप्प्याबद्दल खूप उत्सुक आहोत, असेही तिने पुढे म्हटलंय.
प्रिती सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांची आई बनलीय. तिने स्वतः या गोष्टीचा खुलासा केलाय. तिने डॉक्टर, नर्सेस यांचे आभार मानले आहेत. प्रितीने गुड न्यूज शेअर केल्यानंतर तिच्या चाहत्यांनी इन्स्टाग्रामवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. काही मिनिटांतच प्रितीची ही पोस्ट वाऱ्यासारखी सोशल मीडियावर व्हायरल झालीय.
बॉलिवूडची 'डिंपल गर्ल' म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रीति झिंटाने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. 'वीर झारा', 'कल हो ना हो', 'सलाम नमस्ते' या सारख्या चित्रपटांतून प्रितीने बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. प्रितीने अमेरिकन नागरिक असलेल्या जीन गुडइनफसोबत गुपचूप लग्न केलं होतं. तिच्यापेक्षा तिचा नवरा १० वर्षांनी लहान आहे. फेब्रुवारी २०१६ मध्ये लॉस एंजल्समध्ये ती विवाहबद्ध झाली होती. दोघांनी गुपचूप लग्न केलं होतं.