iffi awards 2023 : तीन पिढ्यांच्या घर- कुटुंबावर भाष्य करणारा ‘गुलमोहोर’ सादर | पुढारी

iffi awards 2023 : तीन पिढ्यांच्या घर- कुटुंबावर भाष्य करणारा 'गुलमोहोर' सादर

पणजी :प्रभाकर धुरी : गोवा येथे आयोजित ५४ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘भारतीय पॅनोरमा’ विभागामध्ये राहुल व्ही. चित्तेला लिखित, दिग्दर्शित ‘गुलमोहोर’ हा चित्रपट सादर झाला. या चित्रपटात बात्रा कुटुंबातील विविध सदस्यांच्या वैयक्तिक कथांच्या गुंफणीतून कुटुंब आणि घर यांचे अर्थ शोधण्याचा प्रयत्न करत असल्याने दाखवण्यात आलं आहे. ( iffi awards 2023 )

संबंधित बातम्या 

पत्र सूचना कार्यालयातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ‘गुलमोहोर’ या चित्रपटात मुख्य भूमिका करणारे अभिनेते मनोज बाजपेयी म्हणाले की, दिग्दर्शकाने चित्रपटाच्या सेटवर निर्माण केलेले घरगुती वातावरण ‘कुटुंब’ या विषयावर आधारित हृदयस्पर्शी चित्रपटाचे चित्रीकरण करताना एखाद्या कार्यशाळेसारखे वाटत होते. ‘कुटुंब’ ही संकल्पना आणि त्यातील भावना चित्रीकरणाच्या पल्याड पोहोचली होती.

कॅमेऱ्यासमोर आम्ही वडील, मुलगा, मुलगी, आई अशी पात्रे रंगवत होतो आणि चित्रीकरण संपल्यानंतर आम्ही एखाद्या कुटुंबाप्रमाणेच एकत्र येऊन आपापल्या कल्पना, हास्य आणि जेवण यांचीही देवाण-घेवाण करत होतो. या वातावरणाने सर्व तरुण कलाकारांना आपापल्या भूमिकेत शिरण्यास आणि त्या भूमिकेचे बारकावे समजून घेण्यास मदत केली. एक कुटुंब, त्यातील सदस्य आणि त्यांचे आपापसांतील नातेसंबंध हा चित्रपट दर्शवितो. या घरगुती वातावरणाशिवाय हे शक्य झाले नसते,” असे बाजपेयी म्हणाले.

‘गुलमोहोर’ या कौटुंबिक चित्रपटामागची संकल्पना विषद करताना चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल व्ही. चित्तेला यांनी सांगितले की, कुटुंब आणि घर यांच्या व्याख्या काळासोबत बदलत जातात आणि आपले वय झाले की त्या बदलतात. मात्र, याच दोन गोष्टी नेहमीच महत्त्वाच्या असतात. हा चित्रपट तीन पिढ्यांच्या संदर्भात कुटुंब आणि घर यांच्या अर्थाबद्दल भाष्य करतो.

‘गुलमोहोर’ या शीर्षकाबद्दल माहिती देताना ते म्हणाले की, ”गुलमोहोर’ हा काव्यात्मक शब्द आहे आणि तो मला गुलजार यांच्या अर्थवाही गाण्यांची आठवण करून देतो. गुलमोहोराची फुले पटकन उमलतात आणि पटकन गळूनही पडतात आणि त्यांची प्रतिमा, मी चित्रपटाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत असलेल्या कथेशी मिळते जुळते आहे. हा चित्रपट दिल्लीमध्ये चित्रित केला आहे.”

गुलमोहोर चित्रपटातील शांती बालचंद्रन याच्यासह मनोज बाजपेयी, शर्मिला टागोर, सिमरन आणि अमोल पालेकर अशा दिग्गज कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. मल्याळी आणि हिंदी चित्रपटांतील फरक सांगताना शांती बालचंद्रन हिने सांगितले की, हिंदी चित्रपटांची एक कॉर्पोरेट औपचारिक रचना असते, मात्र, मल्याळी चित्रपटात असे नसते. पण गुलमोहोर चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी मला सेटवरील स्नेहपूर्ण आणि कौटुंबिक भावनांमुळे ते कॉर्पोरेट वातावरण जाणवले नाही.’ ( iffi awards 2023 )

Back to top button