मुंबई : पुढारी वृत्तसेवा – माझा जन्म श्रीराम आणि सीता यांच्या देशात झाला आहे. राम आणि सीता यांना मी केवळ हिंदूंचा वारसा समजत नाही. देशातील सर्व नागरिकांचे ते दैवत आहेत. रामायण ही आपली सांस्कृतिक मालमत्ता आहे, अशी भावना ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी गुरुवारी मनसेच्या शिवाजी पार्कातील दीपोत्सवाच्या उद्घाटनावेळी व्यक्त केली.
दीपोत्सवाचे उद्घाटन गीतकार जावेद अख्तर, पटकथा लेखक सलीम खान यांच्या हस्ते झाले. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अभिनेता रितेश देशमुख, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, शर्मिला ठाकरे, मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्यासह इतर मनसे पदाधिकारी उपस्थित होते.
जावेद अख्तर यांनी यावेळी जोरदार फटकेबाजी केली. या मंचावर आम्हाला पाहून काही लोकांना आश्चर्य वाटले असेल. राज ठाकरेंना सलीम-जावेदच्या शिवाय दुसरे कोणी मिळाले नाही का, स्वतःला नास्तिक समजणारे जावेद अख्तर या मंचावर कसे, असे प्रश्न अनेकांना पडतील; पण राज ठाकरे हे आमचे परममित्र आहेत. राज ठाकरेंनी शत्रूला जरी आमंत्रण दिले तरी तो नकार देणार नाही. मग, आम्ही तर मित्र आहोत, असे त्यांनी यावेळी सांगितले.
जावेद अख्तर यांनी यावेळी स्वदेस चित्रपटाबाबतचा किस्सा सांगितला. ते म्हणाले, 'स्वदेस'च्या गाण्याचे दुसऱ्याच दिवशी शूटिंग असल्याने तातडीने गाणे हवे होते. मला साधारण गाणे लिहायला दीड तास लागतात. त्यामुळे मी होकार दिला; पण मला रामायणाच्या एका प्रसंगावर गाणे लिहायला सांगितल्याने मी गर्भगळीत झालो. मी तसा नास्तिक. त्यामुळे काय लिहू, असा प्रश्न पडला. मी दिग्दर्शकाला म्हणालो, तुम्ही तर माझ्या मर्डरचीच पुरेपूर तयारी केली आहे.