वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर

Waheeda Rehman
Waheeda Rehman

पुढारी ऑनलाईन डेस्क : सदाबहार अभिनेत्री वहिदा रेहमान यांना यंदाचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहिर झाला आहे. हिंदी चित्रपट क्षेत्रातील उत्तुंग योगदानासाठी ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना हा पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे.

मंत्री अनुराग ठाकुर यांनी पुरस्काराची ही घोषणा केली आहे. अनुराग ठाकुर म्हणाले, 'या वर्षीचा दादासाहेब फाळके लाईफटाईम अचीव्हमेंट पुरस्कारासाठी दिग्गज अदाकारा वहीदा रहमान यांना निवडण्यात आले आहे. वहीदाजी यांना हिंदी चित्रपटातील त्यांच्या भूमिकांसाठी समीक्षकांद्वारे कौतुक करण्यात आले आहे. प्यासा, कागज के फूल, चौदहवी का चांद, साहेब बीवी और गुलाम, गाइड, खामोशीसह अन्य अनेक चित्रपट त्यांच्या नावावर आहेत. आफल्या ५ दशकाहून अधिक करिअरमध्ये आपल्या भूमिका त्यांनी खूप सुंदरपणे साकारल्या आहेत.'

मुंबई: पुढारी वृत्तसेवा

वहिदा रेहमान या जुन्या काळातील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी देवआनंद, गुरुदत्त यांच्यासह अनेक दिग्गज अभिनेत्यांसह काम केले आहे. विविधरंगी अभिनयाचे रंग आपल्या प्रत्येक कलाकृतीत भरणाऱ्या वहिदा रेहमान यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
वहिदा रेहमान यांचा जन्म तामिळनाडूतल्या चेंगलपेट गावात १९३८ मध्ये झाला. हे गाव आता मद्रास या शहराचे उपनगर आहे. त्यांनी त्यांची कारकीर्द तमीळ आणि तेलुगू चित्रपटांपासून सुरु केली. मात्र त्यांना प्रसिद्धी मिळाली ती हिंदी चित्रपटांमधील अभिनयामुळेच.

सोळाव्या वर्षी त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. वय कमी असल्याने चित्रपटाच्या करारावर सहीदेखील करण्यास त्यांना कायद्याने मुभा नव्हती. तसंच तू तुझं नाव बदलून घे असा सल्ला त्यांना गुरुदत्त यांनी दिला होता. मात्र त्यांनी तो सपशेल नाकारला. मला त्यावेळी दिलीप कुमार आणि अन्य एका कलाकाराचं उदाहरण देण्यात आलं होतं. गुरुदत्त माझं नाव बदलण्यासाठी आग्रही होते. मात्र मी साफ नकार दिला. गुरुदत्तना हे वाटत होते की माझं नाव न भावणारे होतं. पण मी नाव बदलणार नाही हे त्यांना सांगितलं. मी माझ्या निर्णयावर खंबीर राहिले. त्यामुळे माझी 'सीआयडी' चित्रपटासाठी निवड करण्यासाठी गुरूदत्त आणि राज खोसला यांना तीन दिवस लागले. १९५६ साली आलेला हा त्यांचा पहिला चित्रपट होता. 'गाईड', 'प्यासा' आणि 'कागज के फूल' हे आपले आवडते चित्रपट असल्याचेही वहिदा रेहमान यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.

कारकीर्दीतील दुसर्‍या टप्प्यातही वहिदा रेहमान यांनी अनेक चरित्र भूमिकाही मोठ्या ताकदीने साकारल्या आहेत. 'रंग दे बसंती' सिनेमातल्या मिसेस राठोड असोत किंवा 'ओम जय जगदीश' सिनेमातल्या सरस्वतीदेवी बत्रा या भूमिका चाहत्यांच्या पसंतीला उतरल्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news