रंजक ‘शॉर्ट अँड स्वीट’ चे पहिले पोस्टर प्रदर्शित | पुढारी

रंजक ‘शॉर्ट अँड स्वीट’ चे पहिले पोस्टर प्रदर्शित

पुढारी ऑनलाईन : गणेश कदम दिग्दर्शित ‘शॉर्ट अँड स्वीट’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. ३ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात एका बुटक्या व्यक्तीची कथा संवेदनशीलपणे रेखाटण्यात आली. चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये ही बाब अत्यंत ठळकपणे अधोरेखित होत आहे. या पोस्टरच्या प्रदर्शनानंतर या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

सोनाली कुलकर्णी, श्रीधर वत्सर, हर्षद अटकरी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे पोस्टर रंजक आहे. त्यातील नायक श्रीधर वत्सर एका टेबलावर उभा राहून सोनाली कुलकर्णीच्या गालाजवळ आपले ओठ पोहोचवण्याचा प्रयत्न करताना या पोस्टरमध्ये दिसतोय. या दृश्यातून चित्रपट रंजक आणि वेगळ्या धाटणीचा आहे, हे अधोरेखित होते. त्यामुळे या चित्रपटाची चर्चा रसिक आणि चित्रपट क्षेत्रामध्ये सुरु झाली आहे.

‘शॉर्ट अँड स्वीट’ ही एक संपूर्णतः कौटुंबिक कथा आहे. ही कथा एका अनपेक्षित आणि अनोख्या अशा कौटुंबिक कथेवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये ओमकार भोजने, रसिका सुनील, तुषार खैर, अजित भुरे आदींच्याही प्रमुख भुमिका आहेत. या चित्रपटाचे सादरीकरण शुभम प्रॉडक्शनचे असून निर्मिती पायल गणेश कदम आणि विनोद राव यांची आहे. हा चित्रपट ३ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होत आहे.

‘शॉर्ट अँड स्वीट’ची कथा, पटकथा आणि संवाद स्वप्नील बारस्कर यांचे असून संगीत संतोष मुळेकर यांनी दिले आहे. राहुल जनार्दन जाधव हे छायाचित्रण दिग्दर्शक आहेत. मंगेश कांगणे यांनी यातील गाणी लिहिली असून सुर्यकांत मगदूम यांनी ध्वनी इफेक्टची जबाबदारी सांभाळली आहे. यामुळे चित्रपटाचा चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

हेही वाचा :

 

Back to top button