पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या नेतृत्वाखालील तुषार हिरानंदानी दिग्दर्शित 'स्कॅम २००३: द तेलगी स्टोरी' ही सोनी लिव्हवरील आगामी मालिका या वर्षातील सर्वाधिक प्रतिक्षित मालिकांपैकी एक आहे. या वेब मालिकेची निर्मिती अप्लाउज एण्टरटेन्मेंटने स्टुडिओनेक्स्टच्या सहयोगाने केली आहे. भारतातील सर्वांत मोठ्या घोटाळ्यांपैकी एक समजल्या जाणाऱ्या मुद्रांक घोटाळ्यावर ही मालिका आधारित आहे. अब्दुल करीम तेलगी सूत्रधार असलेल्या या कल्पनातीत महाकाय घोटाळ्याने संपूर्ण देशाला हलवून सोडले होते. या मालिकेत शशांक केतकर, तलत अझीझ, निखिल रत्नपारखी, विवेक मिश्रा, हिता चंद्रशेखर, अजय जाधव, दिनेश लाल यादव, अमित सोनी, अभिनय बनसोडे, व्योम शर्मा, मोहम्मद युसुफ खान, सय्यद रझा, संजय बोरकर आदी अभिनेते सहाय्यक भूमिकांमध्ये आहेत. ही मालिका १ सप्टेंबरपासून केवळ सोनी लिव्हवर पाहता येणार आहे.
अब्दुल करीम तेलगीच्या भूमिकेतील गगन देव रियारसह या मालिकेत टीव्ही अभिनेत्री व रेडिओ जॉकी सना अमिन शेख, भावना बलसावर, जे. डी. चक्रवर्ती, भरत दाभोलकर व लोकप्रिय मराठी अभिनेता भरत जाधव अशा कलाकारांची फौज आहे. हे सर्व जण वेब मालिकेत महत्त्वाच्या व्यक्तिरेखा निभावत आहेत.
या मालिकेत तेलगीची पत्नी नफिसा हिची भूमिका करणारी सना अमिन शेख खूपच उत्साहात आहे. ती म्हणाली, "मी हंसल सरांच्या कामाची चाहती आहे. स्कॅम २००३च्या सेटवर त्यांच्यासारख्या प्रचंड काम केलेल्या फिल्ममेकरच्या मार्गदर्शनाखाली तसेच तुषारसरांसोबत व संपूर्ण टीमसोबत काम करणे माझ्यासाठी सन्मानास्पद होते. या मालिकेत मी तेलगीच्या पत्नीची भूमिका करत आहे."
मराठी चित्रपट व नाटकांमध्ये सहसा विनोदी भूमिकांमध्ये दिसणारा अभिनेता-निर्माता भरत जाधव भोपाळकर ही व्यक्तिरेखा साकारत आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखेबद्दल विचारले असता, तो म्हणाला, "माझी स्कॅम २००३ मधील भूमिका खूपच वेगळी आहे आणि मी आजवर अशी भूमिका कधीच केलेली नाही. एक व्यक्ती म्हणून तो खूप धूर्त व लबाड आहे आणि आपले काम करवून घेण्यासाठी कोणत्याही पातळीला जाऊ शकतो. माझ्यासाठी ही व्यक्तिरेखा आव्हानात्मक आहे. माझे चाहते कधी एकदा मला या नवीन अवतारात बघतील, असे मला झाले आहे."