पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवंगत अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांचा पाली हिल येथील आलिशान बंगला पाडणार असल्याची माहिती समोर आलीय. दिलीप कुमार यांचे निधन ७ जुलै, २०२१ रोजी झाले होते. त्यांनी 'मुगल-ए-आजम', 'देवदास', 'नया दौर', 'गंगा जमुना' आणि 'मशाल' यासारख्या हिट चित्रपटांमध्य़े दमदार अभिनय साकारला होता. (Dilip Kumar)
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, दिलीप कुमार यांचे कुटुंबीयांनी बंगला पाडण्यासाठी सहमती दर्शवली आहे. त्याजागी एक आलिशान घर बनवण्यासाठी परवानगी दिली आहे. हा प्रोजेक्ट २०२७ पर्यंत पूर्ण होईल. या प्रोजेक्टमध्ये दिलीप कुमार यांचे आयुष्य आणि त्यांच्या आठवणीतील एक संग्रहालयदेखील असेल, जे ग्राउंड फ्लोरवर बनवण्यात येणार आहे. यासाठी वेगळे प्रवेशद्वार असेल.
दिलीप कुमार यांच्या काही चाहत्यांना ही गोषट आवडली नाही. ते निराश असून ही आयकॉनिक निशाणी मिटणार असल्याचे म्हणत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, या प्रोजेक्टमधून ९०० कोटींचा नफा होणार असून, मुंबईतील सर्वात पॉश भागात अर्ध्या एकरात बांधण्यात येणार आहे. या भूखंडाबाबत अनेक वर्षांपासून कायदेशीर वाद सुरू होता. यापूर्वी, दिलीप कुमार यांच्या कुटुंबीयांनी एका रिअल इस्टेट कंपनीवर बनावट कागदपत्रे बनवून जमीन हडप केल्याचा आरोप केला होता. प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर, २०१७ मध्ये, सायरा बानो यांनी घोषित केले की, त्यांनी ही केस जिंकली आहे आणि आलिशान बंगल्याचे मालकी हक्क त्यांना मिळाले आहेत.
ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांनी 'मेला', 'अंदाज', 'दीदार', 'याहुदी' आणि 'मधुमती' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी अविस्मरणीय कामगिरी केली होती.