पुढारी ऑनलाईन: सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आपली जीवनयात्रा संपवली. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीसह राजकीय क्षेत्रातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक राजकीय मान्यवरांनी देखील ट्विटवरून नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिभेचा कलावंत आज गमावला (Nitin Chandrakant Desai) अशा शब्दांमध्ये त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई ह्यांनी कर्जतमधील एन. डी. स्टुडीओमध्ये आत्महत्या केल्याची बातमी धक्कादायक आहे. भारताने प्रचंड ताकदीचा आणि प्रतिभेचा कलावंत आज गमावला आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली आणि ह्या धक्क्यातून, दुःखातून लवकर सावरण्याचे बळ त्यांच्या कुटुंबियांना मिळो (Nitin Chandrakant Desai) ही इश्वरचरणी प्रार्थना !
राज्य चित्रपट पुरस्कार प्राप्त, प्रख्यात कलादिग्दर्शक, निर्माते नितीन चंद्रकांत देसाई यांचे निधन अत्यंत दुःखदायक व वेदनादायक आहे. प्रचंड आत्मविश्वास, नाविन्याची ओढ आणि मेहनत करण्याची तयारी असलेला एक उमदा मराठी उद्योजक आपण गमावला. मराठी सिनेसृष्टी बरोबर सर्वच क्षेत्राला बसलेला हा मोठा धक्का आहे.
प्रचंड मेहनती, महत्त्वाकांक्षी आणि सृजनशील असे भारतीय चित्रपटसृष्टीतील नामांकित कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आपली जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला, हे अस्वस्थ करणारे आहे. त्यांच्या जाण्याने कला क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. नितीन देसाई (Nitin Chandrakant Desai) यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली!, असे ट्विट राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी म्हटले आहे.
सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आपली जीवनयात्रा संपवली, ही बातमी सुन्न करणारी आहे. जोधा अकबर, देवदास, लगान, हरिश्चंद्राची फॅक्टरी सारख्या अनेक सिनेमांसाठी भव्यदिव्य सेट्स त्यांनी उभारले तर राजा शिवछत्रपती या मालिकेसाठी त्यांनी रायगड किल्ल्याची व इतर अनेक ऐतिहासिक मालिकांसाठी हुबेहूब दिमाखदार प्रतिकृती तयार केल्या होत्या. त्यांचे अकस्मात जाणे, दुःखदायक आहे. नितीन देसाई यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली!
प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनाची बातमी अतिशय धक्कादायक व दुःखद आहे. त्यांनी अनेक यशस्वी चित्रपटांचे कला दिग्दर्शन केले होते. त्यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीतील कलाक्षेत्रातील एक नामांकित व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले. भावपूर्ण श्रद्धांजली.
सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक श्री. नितीन देसाई यांच्या मृत्यूची बातमी खूप धक्कादायक आहे. कल्पकतेने नविनतम कलाकृती सादर करण्याची ईश्वरीय देणगी लाभलेल्या या गुणी व्यक्तिमत्वाची अशी "एक्झिट" संपूर्ण मनोरंजन आणि कला क्षेत्राचीच हानी आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो; त्यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!, असेही वन, सांस्कृतिक, मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आयुष्यातून घेतलेली अकाली एक्झिट धक्कादायक आहे. बिग बॅनर्स हिंदी चित्रपटातून लार्जर दॅन लाइफ पडद्यावर दाखविण्यासाठी भव्यदिव्य सेट्स उभारणाऱ्या नितीनजींच्या जाण्याने सिनेसृष्टीने एक हरहुन्नरी कलाकार गमावला आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना त्यांच्या कुटुंबियांनाही या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, असे चित्रा वाघ (भाजप महाराष्ट्र महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष) यांनी म्हटले आहे.
कलादिग्दर्शक आणि माझा मित्र नितीन देसाई यांच्या आकस्मिक निधनाची बातमी ऐकून मन सुन्न झाले. या दुःखात आम्ही देसाई कुटुबीयांसोबत आहोत. ईश्वर नितीनच्या आत्म्यास शांती देवो. ओम शांती!, असे उद्धव ठाकरे नेते मिलिंद नार्वेकर यांनी म्हटले आहे.
एन डी स्टुडिओ चे निर्माता सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची अवघ्या 58 व्या वर्षी एक्झिट मनाला चटका लावणारी आहे. हे दुःख पेलण्याचे बळ त्यांच्या कुटुंबीयांना लाभो, असे उद्धव बाळासाहेब ठाकरे उपगटनेते सुष्मा अंधारे यांनी म्हटले आहे.