प्रथमेश परब-सिद्धार्थ जाधवचा येतोय हॉरर कॉमेडीपट 'सुस्साट' | पुढारी

प्रथमेश परब-सिद्धार्थ जाधवचा येतोय हॉरर कॉमेडीपट 'सुस्साट'

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेय विनोद खोपकर एन्टरटेन्मेंट,ए बी इंटरनॅशनल, मर्ज एक्स आर स्टुडिओ आणि डीएनए पिक्चर्स घेऊन येत आहेत ‘सुस्साट’ हा एक धम्माल हॉरर कॉमेडी चित्रपट. लंडनमध्ये नुकतंच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. या सुपरफास्ट विनोदी भयपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच प्रथमेश परब आणि सिद्धार्थ जाधव एकत्रितपणे विनोदाची आतषबाजी करताना दिसणार आहेत.

‘सुस्साट’ हा हॉरर कॉमेडी चित्रपट अंबर विनोद हडप यानं लिहिला आहे तर विशाल देवरुखकर यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. सिद्धार्थ जाधव, प्रथमेश परब यांच्यासोबत अभिनेत्री विदुला चौगुले पहिल्यांदाच हटके भूमिकेत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणार आहे. विजय केंकरे आणि शुभांगी लाटकर यांच्यासारखे वरिष्ठ कलाकारही या चित्रपटात महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारणार आहेत. या चित्रपटाच्या कथेचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये एका जुनाट प्रथेचा पर्दाफाश धमाल पद्धतीनं केला जाणार आहे.

‘सुस्साट’ या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी अमित बसनीत, प्रजय कामत आणि स्वाती खोपकर यांनी उचलली आहे. तर चित्रपटाचे सह-निर्माते निनाद नंदकुमार बत्तीन,तबरेज पटेल,सनिस खाकुरेल हे आहेत. तसंच, चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी योगेश कोळी यांच्याकडे आहे. कुणाल करण या चित्रपटाचे संगीतकार आहेत.

आजपासून ‘सुस्साट’ चित्रपटाचं चित्रीकरण लंडन मध्ये सुरू झालं आहे. ‘सुस्साट’ चित्रपटाच्या कथेतील अनेक विचित्र योगायोग आणि त्यामुळे उडणारी धम्माल आता पडद्यावर पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

Back to top button