Gufi Paintal : महाभारतातील ‘शकुनी मामा’ गूफी पेंटल काळाच्या पडद्याआड | पुढारी

Gufi Paintal : महाभारतातील 'शकुनी मामा' गूफी पेंटल काळाच्या पडद्याआड

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकप्रिय टीव्ही मालिका महाभारतमध्ये शकुनी मामाची भूमिका साकारणारे अभिनेते गूफी पेंटल यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले. काही दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते. त्यांची प्रकृती खूप गंभीर होती. अभिनेत्री टीना घई यांनी या गोष्टीची पुष्टी केली. आता संपूर्ण टीव्ही जगतात शोककळा पसरली आहे.

बीआर चोपडा यांचा प्रसिद्ध एपिक शो ‘महाभारतात’ गूफी पेंटल यांनी शकुनी मामाची भूमिका साकारली होती. आजदेखील जेव्हा शकुनी मामाच्या अभिनयाची चर्चा होते, तेव्हा गूफी पेंटलचे नाव नक्की घेतले जाते.

मागील काही काळापासून त्यांची प्रकृती खराब होती. दरम्यान, मीडियाशी बोलताना गुफी पेंटल यांचा पुतण्या हितेन म्हणाला की, वयोमानानुसार अनेक आजारांनी ग्रस्त असलेल्या गुफी पेंटल यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. चाहत्यांसह सिनेसृष्टीतील अनेक कलाकार अभिनेते पेंटल यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

गूफी पेंटल इंजिनिअर होते. पुढे इंजिनिअरिंग सोडून ते १९६९ मध्ये मुंबईत आले. स्वातंत्र्यापूर्वी ४ ऑक्टोबर, १९४४ रोजी पंजाबच्या तरन तारनमध्ये त्यांचा जन्म झाला होता. सीआयडी (CID) मालिकेतही त्यांनी आपले काम केले होते. ‘सत्ते पे सत्ता’, ‘गीता मेरा नाम’ आणि ‘निकाह’ यसारख्या चित्रपटात त्यांनी अभिनय केला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार जवळपास ३३ कोटी रुपयांची त्यांची संपत्ती आहे.

मुंबईत आल्यानंतर त्यांनी मॉडलिंगला सुरुवात केली. सोबतच चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम केलं. १९७५ रोजी त्यांना पहिला चित्रपट मिळाला. ‘रफूचक्कर’मधून त्यांनी डेब्यू केला. ‘दिल्लगी’, ‘देस परदेस’, ‘दावा’, ‘सुहाग’, ‘घूम’ यासारख्या चित्रपटांमध्ये ते दिसले.

Back to top button