ढ लेकाचा चित्रपटातील आयुष उलागड्डेला सर्वोकृष्ट बालकलाकार पुरस्कार

पुढारी ऑनलाईन डेस्क : नुकताच पार पडलेल्या अंबर भरारी, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आयोजित ८ व्या अंबरनाथ मराठी फिल्म फेस्टिवल महोत्सवात आयुष उलागड्डेचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. अल्ट्रा मीडिया आणि एंटरटेनमेंट निर्मित “ढ लेकाचा” या चित्रपटात आयुष उलागड्डेने अभिनय केला होता. सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात आले.
हा चित्रपट “अल्ट्रा झकास” मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
“ढ लेकाचा” या चित्रपटाची कथा भाल्या या तरुण मुलाभोवती फिरते. भाल्याच्या शाळेत विक्की देशमुख या विद्यार्थ्याला असलेल्या पैशांची माज असते. त्याच्या गुंडगिरीचा सामना करत तसेच शाळेतील शिक्षणप्रणालीच्या अडचणींना तोंड देत शालेय जीवनात भाल्याला संघर्ष करावा लागतो.
भाल्या वडील आणि पाळीव बकरी बादशाहसोबत एक भावनिक नातं तयार होताना दिसत आहे. आपल्या मुलाच्या मूलभूत गरजा पुरवण्यासाठी अथक परिश्रम करणारे त्याचे वडील सदा लोहार आणि भाल्या यांच्यातील नात्याचे सुंदर चित्रिकरण करण्यात आले आहे.