Tina Turner | हॉलिवूड इंडस्ट्री शोकसागरात! क्वीन ऑफ रॉक ‘एन’ रोल टीना टर्नर काळाच्या पडद्याआड

Tina Turner | हॉलिवूड इंडस्ट्री शोकसागरात! क्वीन ऑफ रॉक ‘एन’ रोल टीना टर्नर काळाच्या पडद्याआड
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : दिग्गज संगीतकार टीना टर्नर यांचे निधन झाले आहे. त्या ८३ वर्षाच्या होत्या. क्वीन ऑफ रॉक 'एन' रोल (the Queen of Rock 'n' Roll) म्हणून ओळखल्या जाणार्‍या टीना टर्नर (Tina Turner) यांनी त्यांच्या गाण्याने जगभरातील लोकांना प्रभावित केले होते. गायक, गीतकार, नृत्यांगना, अभिनेत्री आणि लेखिका अशा विविधांगी क्षेत्रात त्यांनी नाव कमावले. टीना यांचे २४ मे रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. स्वित्झर्लंडमधील झुरिचजवळील कुसनाच्त येथील घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती त्यांचे पब्लिसिस्ट बर्नार्ड डोहर्टी यांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे. याबाबतचे वृत्त People या नियतकालिकाने दिले आहे. (Tina Turner Dies)

"क्वीन ऑफ रॉक 'एन' रोल टीना टर्नर यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी स्वित्झर्लंडमधील झुरिचजवळील कुसनाच्त येथील त्यांच्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने जगाने संगीत क्षेत्रातील एक दिग्गज आणि आदर्श गमावला आहे," असे निवेदनात म्हटले आहे.
"त्यांच्या अंत्यसंस्काराला जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित असतील. कृपया या दुःखाच्या क्षणी त्यांच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करा," असे पुढे निवेदन नमूद केले आहे. अमेरिकन गायिका असलेल्या टीना ह्या १९९४ पासून त्यांचा पती, जर्मन अभिनेते आणि संगीत निर्माते एरविन बाख यांच्यासोबत स्वित्झर्लंडमध्ये राहात होत्या. त्यांना २०१३ मध्ये स्विस नागरिकत्व मिळाले होते. अलिकडील काही वर्षांत त्या स्ट्रोक, आतड्यांसंबंधी कर्करोग आणि अनेक गंभीर आरोग्य समस्यांनी त्रस्त होत्या. किडनी निकामी झाल्याने त्यांना अवयव प्रत्यारोपणाची आवश्यकता होती.

टर्नर यांनी १९५७ मध्ये आयके टर्नरच्या किंग्स ऑफ रिदममधून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. रॉक संगीत क्षेत्रात त्यांची कारकीर्द प्रदीर्घ राहिली. टर्नर यांनी चार दशकांत बिलबोर्ड टॉपमध्ये ४० हिट्स मिळवले. जगभरात १० कोटींहून अधिक त्यांचे रेकॉर्ड विकले गेले आहेत. त्यांना १२ ग्रॅमी पुरस्कार मिळाले आहेत. त्यात आठ स्पर्धात्मक पुरस्कार, तीन ग्रॅमी हॉल ऑफ फेम पुरस्कार आणि एक ग्रॅमी लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार यांचा समावेश आहे. रोलिंग स्टोनच्या मुखपृष्ठावर झळकलेल्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय कलाकार आणि पहिल्या महिला होत्या.

 हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news