सान्या मल्होत्रा ’कटहल’साठी सज्ज | पुढारी

सान्या मल्होत्रा ’कटहल’साठी सज्ज

अभिनेत्री सान्या मल्होत्राने बॉलीवूडमध्ये अतिशय कमी वेळेत आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. ही ‘दंगल गर्ल’ आता ‘कटहल’ या नव्या चित्रपटासह सज्ज झाली असून अलीकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला गेला आहे. अगदी अलीकडेच तिने आपल्याला ‘पगलैट’ हा चित्रपट करायचा नव्हता, असे सांगत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. केवळ भूमिका उत्तम असल्याने आणि गुनीत-एकता यांच्याशी स्नेह असल्याने मी नकार देऊ शकले नाही. पुढे याचमुळे मी ‘कटहल’ चित्रपटदेखील स्वीकारला, असे तिने यावेळी म्हटले.

सान्या पुढे म्हणाली की, ‘पगलैट’ हा चित्रपट करावा की करू नये, याबद्दलदेखील माझ्या मनात साशंकता होती. गुनीत मोंगाची ऑफर फेटाळून लावावी, असा माझा जवळपास निर्णय झाला होता आणि मी यासाठी गुनीतला बोलावलेदेखील होते. याचे कारण असे होते की, त्यापूर्वी कोणत्याही चित्रपटाचे हेडलायनिंग मी केले नव्हते.

सध्या सान्याकडे अनेक प्रोजेक्टस् असून लवकरच ती ‘सॅम बहादूर’ व ‘श्रीमती’ या चित्रपटातून झळकणार आहे. याशिवाय, ती शाहरूख खानसमवेत ‘जवान’ चित्रपटाबाबतही महत्त्वाकांक्षी आहे. शाहरूख खानसमवेत काम करणे माझ्यासाठी एक प्रकारे स्वप्नपूर्ती आहे, असे ती याबाबत बोलताना म्हणाली. ‘जवान’ चित्रपटात सान्याशिवाय नयनतारा, विजय सेतुपती, प्रियामणी, योगी बाबू व रिधी डोग्रा यांचा समावेश आहे.

Back to top button