वानखेडे प्रकरणात शाहरूखही अडचणीत येण्याची शक्यता | पुढारी

वानखेडे प्रकरणात शाहरूखही अडचणीत येण्याची शक्यता

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन याला कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज पार्टीप्रकरणात अटक करणारे राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) मुंबई विभागाचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्याच सांगण्यावरुन किरण गोसावी याने २५ कोटींची खंडणी मागितल्याचे समोर आले आहे. समीर वानखेडे यांनी किरण गोसावीला पैसे मागण्याची पूर्ण सूट दिली होती. त्यामुळेच गोसावी याने १८ कोटींमध्ये सौदा पक्का करत ५० लाख रुपये अॅडव्हान्सही घेतल्याचे समोर आले आहे. हे सिद्ध झाल्यास वानखेडे यांच्यासोबतच शाहरूख खानदेखील अडचणीत येण्याची शक्यता आहे.

सीबीआयने वानखेडेंसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वानखेडे यांनी आपल्या विदेश प्रवासाबाबत योग्य माहिती दिली नाही. त्यांनी त्यांच्या महागड्या घड्याळ आणि कपड्यांबद्दल खोटी माहिती सांगितली. समीर वानखेडे यांच्या बेहिशोबी मालमत्तेचाही गुन्ह्यांत उल्लेख आहे. त्यानुसार, २९ ठिकाणी छापेमारी केली होती. सीबीआयच्या पथकाने यावेळी वानखेडेंची त्याच्या मुंबईतील घरी १३ तासांहून अधिक काळ चौकशी केली होती.
आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात न गोवण्याच्या बदल्यात शाहरुख खानकडे २५ कोटींची लाच मागितल्याचा आरोप आहे. या रकमेच्या बदल्यात आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अडकवणार नाही, असे आश्वासन देण्यात आले होते.

एनसीबीच्या व्हिजिलन्स विभागाने समीर वानखेडे, अधीक्षक विश्व विजय सिंह आणि गुप्तचर अधिकारी आशिष रंजन यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांच्या अहवालात केली आहे.

एनसीबीच्या एका पंचानेच समीर वानखेडे यांच्यासह एनसीबीवर बॉम्ब टाकत आर्यन खान याला ताब्यात घेतल्यानंतर शाहरुख खानकडे २५ कोटी रुपये मागण्यात आले. पुढे १८ कोटींमध्ये सौदा पक्का करत यातील ८ कोटी रुपये वानखेडेंना देण्यात येणार होते आणि बाकीचे वाटून घेण्यात येणार होते, असा दावा केला होता.

Back to top button