आलिया म्हणते, मी विशेष काळजी घेतली  | पुढारी

आलिया म्हणते, मी विशेष काळजी घेतली 

जगातील सर्वात प्रतिष्ठित फॅशन इव्हेंट मेट गाला -2023 मध्ये यंदा बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टने पदार्पण केले. मेट गालामधील आलियाचा ड्रेस मोत्यांनी डिझाईन केला होता. फॅशन डिझायनर प्रबल गुरुंगने हा ड्रेस डिझाईन केला होता. आता आलियाने मेट गालामध्ये पदार्पण करण्याचा अनुभव कसा होता, याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. आलिया म्हणाली की, एवढ्या मोठ्या इव्हेंटमध्ये पदार्पण करण्याआधी माझ्यावर खूप दडपण होते. अगदी रॅम्पवर चालतानाही खूप दबाव असल्याने मी रेड कार्पेटवर पडणार तर नाही, याची विशेष काळजी घेत होते. पडू नये, या भीतीने मी केवळ माझा ड्रेस आणि हिल्सकडे लक्ष देत, चालताना तोल सांभाळत होते.

जगातील सर्वात प्रतिष्ठित इव्हेंटमध्ये सर्वांसमोर फजिती होऊ नये म्हणून प्रचंड मेहनत घेतल्याचेही तिने सांगितले. मेट गाला 2023ला हजेरी लावणे ही माझ्यासाठी खूप मोठी संधी होती. त्यामुळे मनातून मी आनंदी होते, परंतु या प्रचंड उत्साहासह दडपणसुद्धा आले होते. इतका जड ड्रेस घालून सर्वांसमोर, कॅमेर्‍यासमोर पोज द्यायची आणि याचे चेहर्‍यावर कोणतेही दडपण न दाखवता परफेक्ट दिसायचे ही मोठी जबाबदारी असते.

Back to top button