TDM चित्रपटाला शो मिळेनात, कलाकारांनी डोळ्यात पाणी आणून सांगितली व्यथा | पुढारी

TDM चित्रपटाला शो मिळेनात, कलाकारांनी डोळ्यात पाणी आणून सांगितली व्यथा

पुढारी ऑनलाईन डेस्क : TDM चित्रपटाला शो दिले जात नसल्याची खंत चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे आणि चित्रपटातील कलाकार अभिनेत्री कालिंदी आणि पृथ्वीराज थोरात यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी डोळ्यात पाणी आणून हा चित्रपट पाहण्याचे आवाहन प्रेक्षकांना केले. यावेळचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. TDM चित्रपट २८ एप्रिल, २०२३ रोजी प्रदर्शित झालाय.

यावेळी दिग्दर्शक आणि कलाकारांनी चित्रपटगृहात जाऊन आमच्या चित्रपटाला शो दिले जात नसल्याची तक्रार मांडली. भाऊराव कऱ्हाडे यांनी याआधी ख्वाडा, बबन चित्रपट आणला आहे. आता त्यांचा टीडीएम चित्रपट रिलीज झालाय. विदर्भाची कन्या कालिंदी निस्ताने हिने ‘टीडीएम’ चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर एन्ट्री केलीय. चित्राक्षा फिल्म्स आणि स्माईल स्टोन स्टुडिओने टीडीएम चित्रपटाची निर्मिती केली आहे.

याआधी शुक्रवारी केदार शिंदे यांचा महाराष्ट्र शाहीर रिलीज झाला. त्याचबरोबर भाऊराव कऱ्हाडे यांचा टीडीएमदेखील रिलीज झाला. पण, वितरकांकडून शो दिला जात नसल्याचे टीडीएमचे दिग्दर्शक आणि कलाकारांचे म्हणणे आहे.

व्हिडिओमध्ये भाऊराव कऱ्हाडे म्हणाताना दिसतात की, “मला शोसाठी वेळ द्या. आमचा सिनेमा लोकांपर्यंत जाऊ द्या. त्यांना पाहू द्या. लोकचं ठरवतील की, आमचा सिनेमा कसा आहे. प्रेक्षकांची गर्दी पाहून आम्ही या चित्रपटगृहाच्या वितरकांना विनंती केली की, आणखी एक या सिनेमाचा शो दाखवावा. पण त्यांनी ती मान्य केली नाही. आम्ही विचारल्यानंतर आम्हाला या चित्रपटाचा एक शो दाखवण्याचे वरून आदेश असल्याचे सांगितले जाते. आमच्यासोबत असा हा भेदभाव का केला जातो”

अभिनेता पृथ्वीराज थोरात म्हणाला, हा माझा पहिलाच चित्रपट आहे. पण हा प्रकार बघितल्यानंतर मला यापुढे अभिनय करण्याची इच्छा राहिलेली नाही. आमचा चित्रपट महाराष्ट्राची ग्रामीण संस्कृती दाखवतो. आता रसिकांनी ठरवायचे आहे की आमचा चित्रपट बघायचा की नाही.

Back to top button