पुढारी ऑनलाईन : हैदराबादमध्ये 'प्रोजेक्ट के' सिनेमाचे शूटिंग सुरू असताना झालेल्या अपघातानंतर आता महानायक बिग बी अमिताभ बच्चन पुन्हा एकदा आपल्या कामात व्यस्त होऊ पाहत आहेत. याची माहिती त्यांनीच आपल्या ब्लॉगमधून चाहत्यांना दिली आहे.
ते म्हणतात की, 'कामाचे वेळापत्रक तयार झाले आहे. चार्ट आता नव्याने भरायला सुरुवात केली आहे. बरगड्या आणि पायाच्या बोटांमध्ये अद्याप वेदना आहेत. वेदना कमी करण्यासाठी समाधान शोधायला हवे. हैदराबादमध्ये 'प्रोजेक्ट के' सिनेमाचे शूटिंग सुरू असताना अमिताभ यांचा अपघात झाला होता. अमिताभ वयाच्या ८० व्या वर्षी अॅक्शन सीन शूट करत होते. अपघाताला अनेक दिवस होऊनही बिग बी यांची प्रकृती पूर्णपणे ठीक झालेली नाही. तरीही अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे सध्या त्यांच्या प्रकृतीची चर्चा त्यांचे चाहते करत आहेत.
या सिनेमात बिग बींसोबत अभिनेता प्रभास, दीपिका पदुकोण, दिशा पटानी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 'प्रोजेक्ट के' सिनेमाचे शूटिंग २०२१ मध्ये सुरू झाले होते. कोरोनामुळे सिनेमाचे शूटिंग पूर्ण होऊ शकले नाही. पुढे बिग बी जखमी झाल्यामुळे शूटिंग थांबले आहे. हा सिनेमा १२ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार, अशी चर्चा आहे. सध्या बिग बी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहेत.