फुलराणी : सुबोध भावे- प्रियदर्शनी इंदलकरचा चित्रपट यादिवशी रिलीज होणार | पुढारी

फुलराणी : सुबोध भावे- प्रियदर्शनी इंदलकरचा चित्रपट यादिवशी रिलीज होणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘कुछ खास है हम सभी में’, फक्त या ‘खास’ ची जाणीव आपल्याला होणं गरजेचं असतं. आपल्यातील अल्लड अवखळपणा जपत स्वत:चा वेगळा रुबाब घेऊन येणाऱ्या फुलवालीला आपल्यातली ‘फुलराणी’ कशी गवसते हे दाखवणारा विश्वास जोशी दिग्दर्शित ‘फुलराणी’ हा चित्रपट २२ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर आणि अभिनेता सुबोध भावे यांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या या चित्रपटातून शेवंता तांडेलचा ‘फुलराणी’ पर्यंतचा अनोखा प्रवास पहायला मिळणार आहे.

आपल्या मित्राची पैज स्वीकारत ग्रूमिंग कंपनीचे मालक असलेले विक्रम राज्याध्यक्ष शेवंताचा कायापालट करण्याचे आव्हान ते स्वीकारतात आणि सुरू होतो- अल्लड शेवंता’ पासून ‘फुलराणी’ पर्यंतचा अनोखा प्रवास. या प्रवासात नेमक्या कोणत्या अडचणी येतात? या अडचणींवर मात करण्यात विक्रम राज्याध्यक्ष यशस्वी होतात का? ‘शेवंता’ ‘फुलराणी’ पर्यंतचा प्रवास साध्य करणार का? याचा रंजक प्रवास ‘फुलराणी’ चित्रपटात दाखविण्यात आला आहे.

सुबोध भावे आणि प्रियदर्शनी इंदलकर या दोघांसमवेत या चित्रपटात ज्येष्ठ आभिनेते स्वर्गीय विक्रम गोखले, मिलिंद शिंदे, सायली संजीव, सुशांत शेलार, गौरव घाटणेकर, अश्विनी कुलकर्णी, दिपाली जाधव, गौरव मालणकर वैष्णवी आंधळे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.

चित्रपटातील गीतांमध्ये ही नवा सूरसाज जपला असून बालकवींची हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे, ही अजरामर कविता या चित्रपटातून गीतरूपाने आपल्या भेटीला येणार आहे. गीते बालकवी, गुरु ठाकूर, मंदार चोळकर यांची असून संगीत निलेश मोहरीर आणि वरुण लिखाते यांचे आहे. पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर यांचं आहे. अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, प्रियंका बर्वे, हृषिकेश रानडे, आनंदी जोशी, शरयू दाते यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे.

जाई जोशी, ए. राव, स्वानंद केळकर या चित्रपटाचे निर्माते आहेत. या कलाकृतीचे लेखन विश्वास जोशी व गुरु ठाकूर यांनी केले आहे. छायांकन केदार गायकवाड तर संकलन गुरु पाटील आणि महेश किल्लेकर यांचे आहे.

Back to top button