नागराज मंजुळे पै. खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर चित्रपट बनविणार | पुढारी

नागराज मंजुळे पै. खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर चित्रपट बनविणार

जयसिंगपूर ः पुढारी वृत्तसेवा

देशाला कुस्तीत वैयक्तिक खेळात पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे आणि जागतिक दर्जाचे पैलवान राहिलेल्या खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर चित्रपट बनविणार आहे. खाशाबा जाधव हे पद्मश्री पुरस्कारपासून अद्याप वंचित आहेत. खाशाबा यांनी जगात भारत देशासह महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. त्यामुळे या चित्रपटाचे शूटिंग कोल्हापूर जिल्ह्यात करण्यासाठी मी प्रयत्न करत आहे, असे प्रतिपादन चित्रपट निर्माते नागराज मंजुळे यांनी केले.

उमळवाड (ता. शिरोळ) येथे मंगळवारी महाशिवरात्री यात्रेनिमित्त आयोजित भव्य निकाली कुस्त्यांच्या मैदान भरविले होते. यावेळी उपस्थित कार्यक्रमात मंजुळे बोलत होते. आ. डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर तसेच मुख्यमंत्री सहाय्यक निधी कक्ष प्रमुख चिवटे यांची उपस्थिती होती. यावेळी याच कुस्तीच्या मैदानातून नागराज मंजुळे यांनी खाशाबा जाधव यांच्यावर चित्रपट बनविणार असल्याची घोषणा केली. मुख्यमंत्री सहाय्यक कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी कुस्ती मल्लांना दुखापत झाल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून होणार्‍या शस्त्र क्रियेचा खर्च दिला जाईल, अशी घोषणा केली.

दरम्यान, महेंद्र गायकवाड व अभिषेक गुजर यांच्यात प्रथम क्रमांकाची लढत झाली. यात उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड याने घिस्सा बाजी मारत 3 लाख रुपये व चांदीचे गदा पटकावली. तर तीन नंबरच्या कुस्तीत महान भारत केसरी गंगावेस तालमीच्या माऊली जमदाडे याने राकेश कुमारला अस्मान दाखवत 1 लाख रुपयांचे बक्षीस पटकावले. तर लहान गट, मोठ्या गटाच्या चटकदार कुस्त्या झाल्या.

यावेळी सातारच्या निखिल माने या चिमुकल्याने चटकदार कुस्ती केल्याने सर्वजण भारावून गेले. तर कुस्त्यांचे नियोजन महाराष्ट्र चॅम्पियन युवराज काकडे, पै. नितीन पाटील यांच्यासह दानलिंग उत्सव मंडळाने केले होते. यावेळी ग्रामस्थ व कुस्तीशौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button