पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध कवी आणि चित्रपट पटकथा, लेखक जावेद अख्तर यांनी मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यातील दहशतवादी अजूनही पाकिस्तानमध्ये मोकळेपणाने फिरत असल्याचा आरोप केला आहे. जावेद अख्तर नुकतेच पाकिस्तानातील लाहोरमधील अलहमरा कला परिषदेने आयोजित केलेल्या फैज महोत्सवात सहभागी झाले होते. या कार्यक्रमादरम्यानच त्यांनी (Javed Akhtar) पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. यानंतर कंगना राणावतने प्रतिक्रिया दिल्या आहेत.
जावेद अख्तर (Javed Akhtar) फैज महोत्सवात बोलताना भारत – पाकिस्तान दोन्ही देशात समन्वय साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओतून दिसत आहे. 'आमच्या देशाने नुसरत आणि मेहदी हसन याच्यासाठी अनेक मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. पंरतु, पाकिस्तानने दिवगंत प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्यासाठी एकही कार्यक्रम आयोजित केला नाही, अशी खंत व्यक्त केली.
दोन्ही देशांनी एकमेकांना दोष देऊन काहीही फायदा होणार नाही. मी मुंबईचा असून २६-११चा दहशतवादी हल्ला उघड्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. हे दहशतवादी नॉर्वे किंवा इजिप्तमधून आलेले नव्हते तर ते पाकिस्तानातून आलेले होते. आज काय परिस्थिती आहे, मुंबईवर हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानमध्ये खुलेपणाने फिरताना दिसत आहे. ही खंत मात्र, प्रत्येक भारतीयाच्या मनात राहिलेली आहे. यात तुम्हाला वाईट वाटण्याचे काहीच काम नाही,' असे त्यांनी म्हटले.
जावेद अख्तर यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसह बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने त्यावर कमेंट्स केली आहे. कंगनाने 'जावेद अख्तर सरांच्या कविता ऐकायचे तेव्हा मला वाटायचं की, माता सरस्वतीची त्यांच्यावर एवढी कशी कृपा आहे?, परंतु, पाहाच, माणसात काही तरी सत्य असतेच, म्हणूनच ते खरे आहे ते निर्भीड आणि स्पष्टपणे बोलू शकतो…. जय हिंद, मिस्टर जावेद अख्तर… हा हा…'. असे त्याचे कौतुक करताना म्हटलं आहे.
तर एका युजर्सने 'आम्हाला पूर्ण मुलाखत पाहायला मिळाली तर छान होईल', 'खूप छान'. 'याला देशभक्ती म्हणतात', 'भारतरत्न देण्यात यावे', 'म्हणूनच जावेद साहेबांसाठी माझ्या मनात प्रेम आहे'. असे लिहिले आहे. काही नेटकऱ्यांनी कमेंट्स बॉक्समध्ये टाळ्या वाजवून त्याचे कौतुक केलं आहे. लाहोरमध्ये १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसीय फैज महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
हेही वाचा :