शिवकालीन युद्धकलेच्या माहितीपटाला ‘फिल्मफेअर’ | पुढारी

शिवकालीन युद्धकलेच्या माहितीपटाला ‘फिल्मफेअर’

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा – महाराष्ट्राची रांगडी परंपरा जपणार्‍या शिवकालीन युद्धकलेवर आधारित ‘वारसा’ या माहितीपटाला 2022 चा प्रतिष्ठेचा फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त झाला आहे. माहितीपटाची निर्मिती कोल्हापुरातील सचिन बाळासाहेब सूर्यवंशी यांनी केली असून, याबद्दल त्यांना ‘बेस्ट फिल्म – नॉन फिक्शन’ गटातून फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबईतील सेव्हन स्टार हॉटेलमध्ये पुरस्काराचे वितरण झाले.

रयतेचे स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्य शिवछत्रपतींनी ज्या गनिमीकावा युद्धतंत्रावर निर्माण केले, तो वारसा आज शिवकालीन युद्धकला या नावाने परिचित आहे. या युद्धकलेचा वारसा जपण्यासाठी कोल्हापुरातील स्थानिक कसा प्रयत्न करत आहेत, हे या माहितीपटात दाखविण्यात आले आहे. वस्तादांच्या व खेळाडूंच्या मुलाखती, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके असे या पंचवीस मिनिटांच्या माहितीपटाचे स्वरूप आहे.

क्रीडाप्रेमी कोल्हापुरात विविध पारंपरिक खेळांची आवड आजच्या आधुनिक काळातही जोपासण्यात आली आहे. कुस्ती, मल्लखांब, शिवकालीन युद्धकला अशा खेळांचे आखाडे येथे तग धरून आहेत. हा विषय माहितीपटातून मांडला आहे. यासाठी त्यांना संदीप पाटील, प्रसाद पाध्ये, सतीश सूर्यवंशी, सिद्धेश सांगावकर, चिन्मय जोशी, कविता ननवरे, कुणाल सूर्यवंशी, डॉ. शरद भुताडिया, अमित पाध्ये, मीनार देव, प्रशांत भिलवडे, मंदार कमलापूरकर, शुभम जोशी, विनायक कुरणे, किरण देशमुख, सचिन गुरव व सहकार्‍यांची साथ लाभली.

Back to top button