मुंबईतील वांद्रा येथे वाहतुकीचा खोळंबा झाल्याने अनुष्का झाली ट्रोल | पुढारी

मुंबईतील वांद्रा येथे वाहतुकीचा खोळंबा झाल्याने अनुष्का झाली ट्रोल

बॉलीवूडमधील काही तारे-तारकांना आपण इतरांपेक्षा खास असल्याचा भास सातत्याने होत असतो. त्यामुळे आपण काहीही केले तरी ते खपून जाईल, असे त्यांना वाटते. भलेही आपल्यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाला, तरी त्यांना त्याची फिकीर नसते. सध्या याच कारणामुळे अनुष्का शर्मा-कोहली वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. अलीकडेच तिने प्युमा इंडियासंदर्भात एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये तिचे फोटे तिच्या परवानगीशिवाय शेअर केल्यामुळे तिने कंपनीवर टीका केली होती. मात्र, त्याच कंपनीच्या प्रमोशनसाठी जेव्हा अनुष्का रस्त्यावर उतरली तेव्हा अनेकांना धक्का बसला.

म्हणजेच अनुष्काने आधी जे काही केले ते एक नाटक होते. पब्लिसिटीसाठी केलेला स्टंट होता. आता अनुष्काचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिच्यामुळे मुंबईतील वांद्रा येथे मुख्य मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाल्याने अनेकांनी तिच्यावर कडाडून टीका केली आहे. आता सोशल मीडियावर नव्याने व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत अनुष्का एका कारमधून येताना दिसत आहेत. तिच्या आसपास प्रचंड गर्दी जमल्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाल्याचे दिसत आहे. त्यामुळेच तिच्यावर नेटकर्‍यांनी सडकून टीका केली आहे.

Back to top button