पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI), गोवा येथे ज्युरी प्रमुख आणि इस्त्रायली चित्रपट निर्माते असलेले नदाव लॅपिड यांनी भारतीय चित्रपट द काश्मीर फाईल्सवर टीका केल्याने मोठा वाद निर्माण झाला. यानंतर अनेक दिग्दर्शक आणि सेलिब्रिटींकडून नदाव लॅपिड यांना टीकेला सामोरं जावं लागलं होतं. यानंतर आता लॅपिड यांनी माफी मागत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, द काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी एक मोठी घोषणा केली. 'काश्मिरी पंडितांच्या नरसंहारा'वर डॉक्यु-वेब सीरिजची घोषणा त्यांनी केली. (The kashmir Files Unreported)
विवेक अग्निहोत्री यांनी काश्मिरी पंडितांच्या नरसंहारावर डॉक्यु-वेब सीरिजची घोषणा केली. एका वेबसाईटशी बोलताना ते म्हणाले-"मी आता निश्चय केला आहे आणि मी एक घोषणा करत आहे. आमच्याकडे अनेक कथा, किस्से, सत्ये आहेत ज्यातून आम्ही एका ऐवजी १० चित्रपट बनवू शकलो असतो. पण आम्ही एकच चित्रपट करायचं ठरवलं. पण आता मी ठरवले आहे की, मी संपूर्ण सत्य समोर आणणार आहे आणि त्याचे शीर्षक 'द काश्मीर फाईल्स अनरिपोर्टेड' असेल आणि ही सीरीज मी या वर्षाच्या आत पूर्ण करेन. आज मी हा दृढ निश्चय केला आहे."
द कश्मीर फाईल्स हा चित्रपट व्हल्गर आणि प्रोपोगॅंडावर आधारित असल्याचे वाटते, असे लॅपिड यांनी म्हटले होते. कुणीतरी खरे बोलले पाहिजे असे म्हणत लॅपिड यानंतरही ते आपल्या मुद्द्यावर ठाम राहिले. पण वाढता वाद पाहून त्यांनी माफी मागितली आहे. मला कोणाचाही अपमान करायचा नव्हता असे ते म्हणाले होते.