विक्रम गोखलेंच्या मदतीला बिग बी आले होते धावून

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाल्यामुळे मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांनी रंगभूमी, मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमातून रसिकांचे निखळ मनोरंजन केले. सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे विक्रम गोखले आणि बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यामध्ये गहिरा दोस्ताना होता. जेव्हा गोखले यांचे मुंबईमध्ये घर नव्हते तेव्हा बिग बींनी त्यांना मदत केली होती. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात गोखले जेव्हा मुंबईत आले तेव्हा त्यांच्याकडे राहायला घर नव्हते. ते मुंबईत राहण्यासाठी घर शोधत होते. ही गोष्ट बिग बी यांना समजली आणि लगेच ते गोखले यांच्या मदतीला धावले. त्यामुळेच गोखले यांना मुंबईत राहायला घर मिळाले. एका मुलाखतीत गोखले यांनी सांगितले होते की, स्ट्रगलच्या काळात मी मुंबईत आलो तेव्हा माझी आर्थिक परिस्थिती यथातथाच होती. त्यावेळी अमिताभ यांनी मुंबईत घर मिळवून देण्यासाठी मोलाची मदत केली होती.