इफ्फी : चित्रपटसृष्टीत भारत होईल विश्वगुरू - अनुराग ठाकूर    | पुढारी

इफ्फी : चित्रपटसृष्टीत भारत होईल विश्वगुरू - अनुराग ठाकूर   

पणजी : नितीन मोहिते

येणार्‍या काळात भारत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात तसेच माध्यम आणि चित्रपट उद्योगामध्ये विश्वगुरू होईल, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी रविवारी येथे केले.

गोव्याच्या 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) शानदार उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. या सोहळ्यात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा सरकार लवकरच चित्रपटविषयक सर्वंकष धोरण जाहीर करेल, असे सांगितले. चित्रपट निर्मात्यांनी गोव्यामध्ये चित्रिकरणासाठी यावे, असे आवाहनही त्यांनी केले. पणजीजवळील बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर कलावंत आणि राजकारण्यांच्या मांदियाळीत इफ्फीचा पडदा उघडला. यावेळी मंत्री ठाकूर बोलत होते.

ठाकूर म्हणाले, भारत येत्या काही वर्षात चित्रपट सृष्टीबाबत स्वयंपूर्ण होईल. चित्रीकरणापासून ते चित्रीकरण पश्चात सर्वप्रक्रिया भारतामध्येच होतील. हॉलिवूडचे निर्माते भारतात येऊन चित्रपटांचे चित्रीकरण करतील. प्रचंड क्षमतेने आपला देश चित्रपटसृष्टीमध्ये जगात ताकदवान होईल.

यावेळी मनोज वाजपेयी, परेश रावल, सुनिल शेट्टी, अजय देवगण, वरुण धवन, अमृता खानविलकर, मृणाल ठाकूर, सारा अली खान आदी तारे, तारका उपस्थित होते. मंत्री ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याची स्तुती केली.

 

 

 

Back to top button