शाहरुख खान, माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या 'दिल तो पागल है' या चित्रपटाला नुकतीच 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटातील गाणीही प्रचंड गाजली आणि त्या गाण्यावरील नृत्येही गाजली. याच चित्रपटाबद्दल कोरिओग्राफर श्यामक दावर यांनी चित्रपटावर भाष्य केले आहे. या चित्रपटाचा परिणाम आजही चित्रपटसृष्टीवर जाणवत असल्याचे ते म्हणाले. दावर म्हणाले, चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण झाली असली तरी मला तर 15 वर्षे पूर्ण झाल्यासारखीच वाटत आहेत. या चित्रपटातून आपल्या आयुष्यातील जोडीदारावर यश चोप्रा यांनी भाष्य केले. ही प्रेमकहाणी मांडताना त्यांनी नृत्य या माध्यमाचा योग्य वापर केला. या चित्रपटासाठी सर्वोत्तम कोरिओग्राफरचा राष्ट्रीय पुरस्कारही मला मिळाला होता. चित्रपटामुळे नृत्याकडे बघायचा द़ृष्टिकोनच बदलला. या चित्रपटामुळे चित्रपटसृष्टीतील नृत्यांमध्ये खूप मोठा बदल झाला असे आजही अनेक लोक सांगत असतात. हा चित्रपट पुन्हा बनवायचा झाल्यास तो माझ्याशिवाय बनूच शकत नाही, कारण 'दिल तो पागल है' म्हणजे मी असे समीकरण रूढ झाले आहे.