पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या सगळीकडे चर्चा आहे ती कन्नड सिनेमा कांताराची. काही धारणा आणि लोककथेवर बेतलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. अॅक्शन, थ्रिलर या दोन्ही जॉनरना न्याय देणारा सिनेमा म्हणून कांताराचं कौतुक होत आहे. इतकंच नव्हे तर रजनीकांत, शिल्पा शेट्टी आणि अनेक सेलिब्रिटीही या सिनेमाचं कौतुक करताना दिसत आहेत.
या सिनेमाच्या यशाने दिग्दर्शक ऋषभ शेट्टीही समाधानी आहे. कर्नाटकच्या लोककथेवर आधारित असलेल्या या सिनेमाला प्रथम कन्नड भाषेतच बनवलं होतं. पण या सिनेमाला मिळालेला प्रतिसाद पाहता. त्याचं इतर भाषांमध्येही डबिंग करण्यात आल्याचं ऋषभने सांगितलं.
या सिनेमाचा प्रसार चाहत्यांनी केला असल्याच त्याने सांगितलं. कन्नड रिलीजनंतर हा सिनेमा इतर भाषांमध्येही रिलीज करण्यासाठी ट्वीट केले जात होते. या सिनेमाने मिळवलेल्या यशामागे एक दोन नाहीतर 18 वर्षांची मेहनत असल्याचंही ऋषभने सांगितलं.
मनुष्य आणि प्रकृतीच्या परस्परसंबंधांवर आधारित असलेल्या या सिनेमाच्या क्लायमॅक्सचं अनेकांनी कौतुक केलं आहे. प्रादेशिक भाषेतील एखादा सिनेमा रिलीज झाला की, त्याच्या हिंदी रिमेकची सर्वत्र चर्चा होऊ लागते. कांताराबाबत ती झाली नसल्यास नवलच. पण दिग्दर्शक ऋषभ शेट्टीने मात्र या गोष्टीवर प्रतिक्रिया दिली आहे. एका वेबपोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये ऋषभने ही बाब स्पष्ट केली की तो कांताराचा हिंदी रिमेक बनवू इच्छित नाही. या सिनेमाचा क्लायमॅक्स हा खूप मनापासून आणि युनिक असा बनवला आहे त्यामुळे त्याला रिक्रिएट करण्याची अजिबात इच्छा नसल्याचं त्याने स्पष्ट केलं.