अजय देवगणकडून 'पॅनोरमा म्युझिक'चा श्रीगणेशा | पुढारी

अजय देवगणकडून 'पॅनोरमा म्युझिक'चा श्रीगणेशा

मुंबई; पुढारी ऑनलाईन : सिनेनिर्मिती क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांनी ‘पॅनोरमा म्युझिक’ या संगीतमय लेबलची नुकतीच घोषणा केली आहे. बॅालिवूड स्टार अजय देवगण याने सोशल मीडियाच्या माध्यमातून पॅनोरमा म्युझिकच्या लेबलचं प्रमोशन करणारा व्हिडीओ शेअर केला आहे. ही आनंदाची बातमी आपले चाहते आणि संगीतप्रेमींपर्यंत पोहोचवली आहे.

चॅनल सबस्क्राईब करून सुमधूर संगीताचा आस्वाद घेण्याचे आवाहनही केलं आहे. ‘पॅनोरमा म्युझिक’चे नेतृत्व राजेश मेनन करणार आहेत. या लेबलअंतर्गत ओरिजनल सिंगल्स, चित्रपट संगीत, स्वतंत्र संगीत आणि प्रादेशिक कॉन्टेंटची निर्मिती केली जाणार आहे.

संगीतकारांसोबतच कलाकारांना एक हक्काचं व्यासपीठ देण्याच्या हेतूनं सुरू केलेलं हे लेबल प्रादेशिक भाषेतील संगीत निर्मितीवर विशेष भर देईलच.

पण, यासोबतच हिंदी निर्मितीमध्ये मुख्यतः सूफी, गझल आणि भक्तिमय अशा विविध संगीतरचनांचा समावेश करण्यात येईल.

‘पॅनोरमा म्युझिक’च्या घोषणेच्या निमित्तानं अजय देवगण म्हणाले की, ‘संगीताचं माझ्या मनात वेगळं स्थान असल्यानं संगीताची आवड मी कायम जोपासली आहे.

डिजिटल माध्यमांमुळे संगीतामधील संधी वाढल्या आहेत. भारताला एक समृद्ध संगीत परंपरा लाभली असून, यातील अद्याप अनेक पैलू समोर आलेले नाहीत.

‘पॅनोरमा म्युझिक’ हे पॅनोरमा स्टुडिओचं योग्य दिशेनं टाकलेलं पाऊल असून, मी त्यांच्या या उपक्रमाला शुभेच्छा देतो’.

अभिषेक पाठक म्हणाले की, ‘मनोरंजनाच्या पिढीच्या क्षितिजाचा विस्तार करताना मी आनंदीत झालो आहे. संगीत क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या कलाकारांसाठी एक नवं प्लॅटफॅार्म खुलं करून देताना मला खूप आनंद होत आहे.

भारतीय संगीताची परंपरा अधिक उज्ज्वल करणाऱ्या आणि सर्वदूर पोहोचवणाऱ्या संगीताची निर्मिती आम्हाला करायची आहे.

पॅनोरमा म्युझिकचे सीईओ राजेश मेनन म्हणाले की, संगीत क्षेत्रातील एक ‘वन-स्टॅाप डेस्टिनेशन’ असणाऱ्या या लेबलचं नेतृत्व करण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे.

आम्ही नक्कीच दर्जेदार व रसिकांच्या हृदयाला स्पर्श करणारी संगीत निर्मिती करू अशी आशा आहे. गणेश चतुर्थीपूर्वी पॅनोरमा म्युझिक अंतर्गत पहिला म्युझिक व्हिडीओ लाँच करण्यात येणार आहे.

Back to top button