आर्यन खानला ठरवून टार्गेट केले गेले

आर्यन खान
आर्यन खान

मुंबई : पुढारी वृत्तसेवा – बॉलिवूडचा बादशहा अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात ठरवून टार्गेट करण्यात आले. त्याच्या अटकेने गाजलेल्या बहुचर्चित कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणाचा तपास करणार्‍या नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो तथा एनसीबीच्या सात ते आठ अधिकार्‍यांची भूमिका ही संशयास्पद होती, असा ठपका एनसीबीच्याच अंतर्गत विशेष तपास अहवालात ठेवण्यात आला आहे. हे सर्व प्रकरण हाताळणारे वादग्रस्त अधिकारी समीर वानखेडे यामुळे आणखी अडचणीत येऊ शकतात.
गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात मुंबईहून गोव्याला जाणार्‍या कॉर्डिलिया क्रूझवर एनसीबीचे मुंबईतील प्रमुख समीर वानखेडे यांच्या पथकाने छापे टाकून आर्यन खान, अरबाज मर्चंटसह सात जणांना अटक केली होती. तत्कालीन मंत्री नवाब मलिक यांच्या पाठोपाठ एनसीबीच्या पंचांनीही पैशांच्या मागणीचे गंभीर आरोप एनसीबीच्या अधिकार्‍यांवर केले. याची दखल घेत एनसीबीच्या दिल्ली मुख्यालयाने उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना केली होती. या पथकाने समीर वानखेडे याची देखील चौकशी केली. या चौकशीचा अहवाल तीन महिन्यापूर्वी एनसीबीचे महासंचालक यांना सादर करण्यात आला तो आता माध्यमांपर्यंत पोहोचला आहे.

आर्थिक तपास बाकी

संशयास्पद वर्तन असलेल्या अधिकार्‍यांवर सध्या विभागीय कारवाई सुरु आहे. या तपासात अनेक त्रुटी आढळून आल्या असून तपासाबाबत अनेक शंका आणि प्रश्नचिन्हे उपस्थित करण्यात आली आहेत. काही अधिकार्‍याची भूमिका ही दोन गुन्ह्यात संशयास्पद आढळून आली आहे. तर, तक्रारदाराने जबाब फिरवल्याने पैशांच्या देवाण घेवाणी बाबत पूर्ण तपास झाला नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. अंमलीपदार्थ प्रकरणात आर्यन खानला जाणून बुजून लक्ष्य करण्यात आल्याचेही या अहवालात नमुद करण्यात
आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news