कॉमेडीचा बादशहा राजू श्रीवास्तव | पुढारी

कॉमेडीचा बादशहा राजू श्रीवास्तव

पुढारी वृत्तसेवा :  राजू श्रीवास्तव यांचा जन्म उत्तर प्रदेशातील कानपूर येथे 25 डिसेंबर 1963 रोजी झाला. लहानपणी त्यांचे नाव सत्यप्रकाश होते. नंतर त्यांना राजू या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले. रमेशचंद्र श्रीवास्तव असे राजू यांच्या वडिलांचे नाव असून ते एक प्रख्यात कवी होते. ते बालाई काका नावाने प्रसिद्ध होते. राजू श्रीवास्तव यांनी कॉमेडीमध्ये एका अढळ स्थान मिळाले. त्यांना कॉमेडीचा बादशहा म्हणून ओळखले जाऊ लागले.

लहानपणापासूनच राजू श्रीवास्तव यांना मिमिक्री आणि कॉमेडी करण्याची आवड होते. दूरचित्रवाहिनीवरील ‘दि ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कार्यक्रमाद्वारे त्यांचे देशभरात नाव झाले. राजू यांचे लग्न 1993 मध्ये झाले होते. त्यांना दोन मुले आहेत. श्रीवास्तव यांनी राजकारणातही नशीब आजमावले होते. 2014 मध्ये समाजवादी पक्षाने कानपूर लोकसभा मतदारसंघात त्यांना तिकीट देण्याची तयारी दर्शवली होती; पण निवडणूक लढविण्यास त्यांनी नकार दिला होता. यानंतर ते भाजपमध्ये सामील झाले होते. स्वच्छ भारत अभियानावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे नामांकन केले होते.

यानंतर देशाच्या विविध भागात श्रीवास्तव यांनी स्वच्छ भारत मोहिमेचा प्रचार केला. 2019 मध्ये श्रीवास्तव यांना उत्तर प्रदेश चित्रपट विकास परिषदेचे अध्यक्ष बनविण्यात आले होते. राजकारण आणि कला क्षेत्रात कार्यरत असूनही राजू श्रीवास्तव आपल्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत असत. दररोज ते जिममध्ये व्यायाम करीत असत. सोशल मीडियावरही ते सक्रिय होते. चाहत्यांना हसवत राहणे हे त्यांनी कर्तव्य मानले होते. त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हसविणारे अनेक व्हिडिओ पाहावयास मिळतात.

‘शोले’ चित्रपटाचा प्रभाव

राजू श्रीवास्तव महानायक अमिताभ बच्चन यांचे मोठे फॅन होते. ते नेहमीच अमिताभ बच्चन यांची मिमिक्री करताना पाहावयास मिळत होते. विशेषतः त्यांनी ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाची अमिताभ बच्चन यांच्या आवाजात मिमिक्री केली होती. ‘शोले’ चित्रपट पाहिल्यानंतर राजू यांचे नशीब पालटले. ‘शोले’ चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेचा त्यांच्यावर एवढा प्रभाव पडला की, त्यानंतर राजू यांनी अनेक कॉमेडी शो केले.

छोटा अमिताभ

राजू श्रीवास्तव पहिल्यांदा केवळ आपल्या समाधानासाठी पार्ट्यांमध्ये लोकांचे मनोरंजन करण्याचे काम करत होते. खळखळून हसविल्याबद्दल त्यांना पार्टीत एका व्यक्तीने 50 रुपयांचे बक्षीस दिले. त्यानंतर त्यांनी कॉमेडीमध्ये आपले करिअर करण्याचे ठरवले. 1982 मध्ये राजू कानपूरहून मुंबईला आले. त्यांना सुरुवातीच्या काळात खूप संघर्ष करावा लागला. ते स्थानिक आर्केस्ट्रातून अमिताभ बच्चन यांची मिमिक्री करू लागले. लोक त्यांना छोटा अमिताभ बच्चन म्हणून बोलवू लागले. याच दरम्यान त्यांना ‘तेजाब’सारख्या हिंदी चित्रपटांत ब्रेक मिळाला. ‘मैने प्यार किया’ या सुपरहिट चित्रपटात छोटी भूमिका मिळाली. मात्र, त्यांना बॉलीवूडमध्ये खरी ओळख मिळाली ती अजय देवगण याच्या ‘दिलवाले’ या चित्रपटातून!

Back to top button