

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : सोनी टीव्हीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो 'कौन बनेगा करोडपती'च्या १४ व्या (केबीसी १४) सिझनचा पहिला करोडपती नुकताच मिळाला आहे. कोल्हापुरात राहणाऱ्या कविता चावला या एक कोटी रुपयांच्या बक्षिसाच्या मानकरी ठरल्या आहेत. मात्र, कविता यांनी 'केबीसी'चा सर्वोच्च टप्पा पार करून ७ कोटी रुपये जिंकले की नाहीत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कविता चावला या गांधीनगर (ता. करवीर) येथील रहिवासी आहेत. त्यांचे पती विजय चावला हे कापड व्यापारी असून कविता चावला या गृहिणी आहेत.
कविता यांनी या पूर्वीही 'कौन बनेगा करोडपती'मध्ये सहभाग घेतला होता; मात्र हॉटसीटवर बसण्याची संधी त्यांना मिळू शकली नव्हती, तरीही पराभवाने खचून न जाता त्यांनी आपल्या प्रयत्नात सातत्य ठेवत हे लाखमोलाचे यश मिळवले आहे.
'केबीसी'चे अँकर अभिनेता अमिताभ बच्चन यांनीसुद्धा त्यांच्या आत्मविश्वासाची आवर्जुन प्रशंसा केली. मुलगा विवेकसोबत कविता या शोमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या यशाची गाथा सांगणारा 'केबीसी'चा खास भाग सोमवारी आणि मंगळवारी सोनी टीव्हीवर प्रसारित होणार आहे.