

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'डिस्नी' हे नाव भारतीयांसाठी नवे नाही. मिकी माऊस, डोनल्ड डक आणि विविध कार्टून कॅरेक्टरमुळे हे नाव अनेक भारतीयांना गेल्या 30-40 वर्षांत माहिती आहे. डिस्नी कंपनीचे हे 100 वे वर्ष आहे. 1923 मध्ये या कंपनीची सुरुवात झाली होती आणि आजघडीला जगात सर्वात मोठी मनोरंजन क्षेत्रातील कंपनी कोणती असेल तर ती डिस्नी आहे.
पिक्सार, मार्व्हल स्टुडिओज, ट्वेंटीएथ सेंच्युरी फॉक्स स्टुडिओज, लुकास स्टुडिओज, नॅशनल जिऑग्राफिक इत्यादी असा या कंपनीचा मोठा पसारा आहे. वॉल्ट डिस्नी यांनी सुरू केलेल्या या कंपनीच्या शताब्दी महोत्सवाची सुरुवात कॅलिफोर्नियाच्या अनाहाईम येथील डिस्नीलँडमध्ये 'डी 23 एक्सपो' या फॅन इव्हेंटद्वारे झाली. कंपनीतर्फे दर दोन वर्षांनी हा एक्स्पो होत असतो. कोरोनामुळे 2021 मध्ये हा कार्यक्रम झाला नव्हता. यात पहिल्या दिवशी विविध सत्रांमध्ये डिस्नी, पिक्सार आणि डिस्नी अॅनिमेशन स्टीडिओच्या नव्या चित्रपट आणि सीरिजची घोषणा झाली.
या इव्हेंटमध्ये दुसर्या दिवशी जेम्स कॅमेरून दिग्दर्शित 'अवतार : द वे ऑफ्द वाटर' या चित्रपटाचे एक्स्लुझिव्ह थ—ीडी /फुटेज दाखवले गेले. चित्रपटाचे नवे पोस्टरही रीलिज केले गेले.
मार्वल स्टुडिओजचे अध्यक्ष केविन फायगी यांनी 'आयर्न हार्ट' सीरिजची घोषणा केली. तसेच 'हॉकआय' सीरिजमध्ये दिसलेला 'एको' हा पहिला मूकबधिर सुपरहिरो असणार आहे. तसेच त्यांनी 'डेयरडेव्हिल ः बॉर्न अगेन' या सीरिजचीही घोषणा केली.
या एक्स्पोमध्ये कंपनीच्या भारतातील महत्त्वाकांक्षी योजनाही समोर आल्या आहेत. भारतात दर महिन्याला 70 कोटी प्रेक्षक डिस्नी कंपनीचे कार्यक्रम टीव्ही, चित्रपट, सीरिजच्या माध्यमातून पाहत असतात. देशात डिस्नी प्लस हॉटस्टारच्या ग्राहकांची संख्या 5.8 कोटी इतकी आहे. येथे भारतातील 9 भाषांतील कंटेट आहे. एक्स्पोमध्ये 'महाभारत'वर एक भव्य मेगाबजेट सीरिज बनविण्याची घोषणा करण्यात आली असून त्याच्या पटकथेवर काम सुरू झाले आहे. हिंदीत बनणारी ही सीरिज सर्व भारतीय भाषांमध्ये तसेच परदेशी भाषांमध्ये उपलब्ध केली जाणार आहे. निर्माता मधु मंटेना यांनी काही काळापूर्वी दीपिका पदुकोनला घेऊन 'द्रौपदी' चित्रपट बनविण्याची घोषणा केली होती. हाच चित्रपट आता वेबसीरिज म्हणून विकसित केला जात आहे. यात महाभारताची कहाणी द्रौपदीच्या पॉईंट ऑफ व्ह्युने उलगडणार आहे.
लुकास फिल्म्सच्या चेयरमन कॅथलीन केनेडी यांनी 'स्टार वॉर्स' फ्रँचायजीच्या पाच नव्या सीरिजची घोषणा केली. स्टार वॉर्स ः टेल्स ऑप जेडाई 26 ऑक्टोबर रोजी तर 'स्टार वॉर्स ः बॅड बॅच'चा दुसरा सीझन 4 जानेवारी रोजी येणार आहे. 'स्टार वॉर्स ः अहसोका', 'स्टार वॉर्स ः स्केलेटन क्रू' यांचे शूटिंग सुरू झाले आहे. 'स्टार वार्स : द मँडोलोरियन'चा सीझन 3 पुढील वर्षी येईल. या शिवाय लुकास फिल्म्सची नवी वेबसीरिज 'एंडोर'चे शूटिंग पूर्ण झाले आहे. येत्या दोन आठवड्यात ही सीरिज स्ट्रीम होणार आहे. 30 नोव्हेंबर रोजी रीलिज होणार्या 'विलो'या वेबसीरिजची झलकही दाखविण्यात आली.
करन जोहरच्या 'कॉफी विथ करन'च्या आठव्या सीझनची घोषणाही करण्यात आली असून डिस्नी प्लस हॉटस्टारसाठी करन 'शोटाईम'नावाची वेबसीरिज बनवणार आहे. या सीरिजमध्ये बॉलीवूडमधील चित्रपट घराणी आणि बाहेरून आलेल्या कलाकारांमधील संघर्ष दिसेल.
लुकास फिल्मसने या इव्हेंटमध्ये चाहत्यांना एक सरप्राईज दिले. त्यांनी पुढील वर्षी रीलिज होणार्या 'इंडियाना जोन्स 5'चा एक्सक्लुझिव्हचा ट्रेलर येथे दाखवला. हा ट्रेलर अद्याप कुठेही रीलिज करण्यात आलेला नाही. अभिनेता हॅरिसन फोर्ड यांच्या कल्ट क्लासिक 'इंडियाना जोन्स' या चित्रपट फ्रँचायजीतील हा पाचवा चित्रपट 30 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.