

पुढारी ऑनलाईन डेस्क : Honey Singh Divorce : पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या गाण्यांची जादू चालवणारा गायक यो यो हनी सिंग सध्या चर्चेत आहे. हनी सिंग आणि त्याची पत्नी शालिनी तलवार यांचा घटस्फोट झाल्याचे वृत्त समोर आले आहे. गेल्या वर्षी दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात पत्नी शालिनीने पती यो यो हनी सिंगवर घरगुती हिंसाचार आणि इतर महिलांसोबत शारीरिक संबंधांसह अनेक गंभीर आरोप करत घटस्फोटासाठी अपील केले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शालिनीने पती हनी सिंगकडून घटस्फोटासाठी 10 कोटी रुपयांच्या पोटगीची मागणी केली होती. मात्र, आता दोघांमध्ये एक कोटी रुपयांचा करार पक्का झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गायक यो यो हनी सिंग आणि पत्नी शालिनी तलवार यांचा आता अधिकृतपणे घटस्फोट झाला आहे. हनी सिंगने गुरुवारी दिल्लीतील साकेत जिल्हा न्यायालयाच्या कौटुंबिक न्यायालयात सीलबंद कव्हरमध्ये शालिनी तलवार यांना पोटगी म्हणून एक कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केल्याचे समजते. (Honey Singh Divorce)
गुरुवारी दिल्लीच्या साकेत जिल्हा न्यायालयाच्या कौटुंबिक न्यायालयात यो यो हनी सिंग आणि शालिनी तलवार यांच्यात बराच काळ आरोप-प्रत्यारोप चालल्याचे वृत्त आहे. पण काही वेळाने प्रकरण निवळले. दोघांनी आता एक कोटी रुपयांच्या पोटगीवर समझोता केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 मार्च 2023 रोजी होणार आहे.
3 ऑगस्ट 2021 रोजी दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयात पत्नी शालिनी यांनी रॅपर आणि गायक यो यो हनी सिंग याच्यावर घरगुती हिंसाचार आणि मारहाणीचा आरोप करणारी याचिका दाखल केली होती. तसेच शालिनीने हनी सिंगवर अत्याचार केल्याचाही आरोप केला होता. त्यांच्या लग्नाला 10 वर्षे झाली आहेत, मात्र त्याबदल्यात शालिनीचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात आहे, असे तिने म्हटले होते. हनी सिंग आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर जाण्याच्या बहाण्याने अनेक महिलांसोबत अवैध शारीरिक संबंध ठेवायचा असाही गंभीर आरोप शालिनीने केला होता. दरम्यान, शालिनीने हनी सिंगकडून १० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली होती. (Honey Singh Divorce)
शालिनी तलवारच्या गंभीर आरोपांनंतर हनी सिंगने 6 ऑगस्ट 2021 रोजी सोशल मीडियावर एक खास नोट शेअर केली होती. या चिठ्ठीत त्याने आपल्यावरील आरोप खोटे असल्याचे म्हटले होते. त्याने नोटमध्ये लिहिलं होतंकी, माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले हे अतिशय दुःखद आहे. या आरोपांनी मला खूप त्रास झाला. माझ्यावर लावण्यात आलेले आरोप अत्यंत निंदनीय असून केवळ मला त्रास देण्यासाठी हे आरोप केले जात आहेत', असे त्याने स्पष्टीकरण दिले होते. (Honey Singh Divorce)
यो यो हनी सिंग आणि शालिनी तलवार यांचा विवाह 2011 मध्ये झाला होता. दोघांनी प्रेमविवाह केला होता. दोघांची प्रेमकहाणी शाळेपासून सुरू झाली. 20 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 23 जानेवारी 2011 रोजी लग्न केले. मात्र, लग्नाच्या 10 वर्षानंतर दोघांचा घटस्फोट झाला.