पुढारी ऑनलाईन डेस्क : 90's मधल्या प्रत्येक टिनएजरची म्यूजिक प्लेलिस्ट ज्या बॅंडच्या गाण्याशिवाय अपूर्ण आहे तो म्हणजे युफोरिया. रॉक बॅंड ही कन्सेप्ट युफोरियाने सेट केली. 'माएरी', 'कभी आना तू मेरी गली' ही गाणी आजही अनेकांच्या ओठांवर आहेत. या गाण्याचा गायक असलेल्या पलाश सेन याच्या आवाजाचे आपण सगळेच फॅन आहोत.
बॉलीवूडच्या इतर झगमगाटापासून हा बॅंड कायमच वेगळा राहिला आहे. काही मेडिकल विद्यार्थ्यानी येऊन सेट केलेला हा बॅंड त्यामुळेच त्यावेळच्या संगीतापेक्षा काहीतरी वेगळं देण्यात यशस्वी झाला आहे. या बॅंडने हिंदी रॉक म्युझिक तबला आणि बासरी या वाद्यांसाह ही संकल्पना तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवली.
या बॅंडचा गाता चेहरा म्हणून पलाश सेन यांची ओळख आहे. डॉक्टर असलेल्या पलाशने आपल्या आवाजाने सगळ्यांनाच वेड लावलं. पलाश मेघना गुलजार दिग्दर्शित 'फिलहाल' या सिनेमातही दिसला होता. पण त्यानंतर मात्र त्याने फिल्मी दुनियेला आणि अभिनयाला राम राम ठोकला आणि सर्व लक्ष म्युझिकवर केंद्रीत केलं. पण पलाश आणखी एका कारणाने चर्चेत आहे. हे आहे तो घालत मंगळसूत्रामुळे. होय तुम्ही योग्य शब्द वाचला आहे. अनेक सुरेल गाणी गाणार्या या गायकाच्या गळ्यात अनेकांनी मंगळसूत्र पाहिलं आहे. पलाशच्या अनेक फोटोंमध्ये तुम्ही त्याच्या गळ्यात मंगळसूत्र पाहू शकता.
मंगळसूत्रासारखा दागिना फक्त स्त्रियांसाठी बनला आहे अशी धारणा असलेल्या आपल्या देशात पलाशचं मंगळसूत्र घालणं चर्चेचा विषय बनून गेलं. याबाबत त्याला एका फॅनने विचारलं असता त्याने खास अंदाजात उत्तर दिलं. पलाश म्हणतो 'हे मंगळसूत्र माझ्या आईचं आहे. माझ्या वडिलांचं निधन झाल्यानंतर तिने ते घालणं सोडून दिलं होतं. त्यामुळे ते मी घालायला सुरू केलं. अर्थात आता माझं लग्नही झालं असल्याने मी मंगळसूत्र वापरणं मला गैर वाटत नाही. आपल्या 'महफुज' या अल्बमला पलाशने आई आणि पत्नी शालिनीला समर्पित केलं होतं.