चित्रपट आणि महागडे सेटस् | पुढारी

चित्रपट आणि महागडे सेटस्

नुकताच रणबीर कपूर आणि संजय दत्त यांचा ‘शमशेरा’ चित्रपट येऊन गेला. चित्रपट बॉक्सऑफिसवर सपशेल आपटला. तथापि, या चित्रपटातील सेटबाबत एक गोष्ट समोर आली की, हा सेट 500 कामगारांनी 4 महिने राबून तयार केला होता. यापूर्वीही अनेक बिग बजेट चित्रपटांसाठी मोठमोठे आणि खर्चिक सेटस् तयार केले गेले होते. एक संपूर्ण चित्रपट बनेल इतका खर्च एखाद्या चित्रपटाचा सेट बनवायला आलेला आहे. अशाच काही चित्रपटांतील सेटस्विषयी…

मुघल-ए-आझम

चित्रपटाच्या उत्तमोत्तम सेटची चर्चा झाली की, ‘मुघल-ए-आझम’ चित्रपटाचा उल्लेख होतोच होतो. या ऐतिहासिक प्रेमकहाणीच्या शूटिंगसाठी तेव्हा 1.5 कोटी रुपये खर्च आला होता. या चित्रपटातील ‘प्यार किया तो डरना क्या…’ या एका गाण्यासाठी सेट बनविण्यास दोन वर्षे लागली होती आणि या गाण्याचे शूटिंग करण्यासाठी 10 लाख रुपये खर्च आला होता.

देवदास

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘देवदास’च्या सेटची त्या काळात खूप चर्चा झाली होती. शाहरूख खान, ऐश्‍वर्या राय, माधुरी दीक्षित यांच्या करिअरमधील हा महत्त्वाच्या चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘देवदास’चा सेट डिझाईन करण्यासाठी 9 महिने वेळ लागला होता. त्यावेळी या सेटसाठी 20 कोटी रुपये खर्च आला होता. यातील चंद्रमुखीच्या कोठ्याच्या सेटसाठी 12 कोटी रुपये खर्च झाला होता. या चित्रपटाचे बजेट 50 कोटी रुपये होते.

बाजीराव-मस्तानी

संजय लीला भन्साळींचा आणखी एक मोठा चित्रपट ‘बाजीराव मस्तानी’चे शूटिंग विविध 23 मोठ्या सेट्ससह गुजरातच्या आरसे महालात केले गेले होते. या चित्रपटाचे सेटस् बनविण्यासाठी 8-9 महिन्यांचा कालावधी लागला होता. चित्रपटाचे एकूण बजेट 145 कोटी रुपये होते. सेट, कलाकारांचा पोशाख यावर यातील बरेचसे बजेट खर्च झालेहोते.

जोधा-अकबर

दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या या ऐतिहासिक चित्रपटात ऋतिक रोशन आणि ऐश्‍वर्या राय बच्चन मुख्य भूमिकेत होते. कर्जत येथे या चित्रपटाचा सेट बनवला होता. त्यासाठी 12 कोटी रुपये खर्च आला होता.

साँवरिया

संजय लीला भन्साळी यांच्या या रोमँटिक चित्रपटातून रणबीर कपूर आणि सोनम कपूर यांनी पदार्पण केले होते; पण चित्रपट पडला होता. तथापि, या चित्रपटाचा आलिशान सेट 40 कोटी रुपये खर्चून बनविण्यात आला होता. 250 कामगारांनी 25 दिवस काम करून हा सेट उभारला होता.

प्रेम रतन धन पायो

सूरज बडजात्या दिग्दर्शित या चित्रपटाचे शूटिंग अनेक किल्ले आणि महालांमध्ये झाले होते. या चित्रपटातील भव्य सेटस्साठी 13 ते 15 कोटी रुपये खर्च झाले होते. या चित्रपटाचे बजेट 180 कोटी रुपये होते.

बॉम्बे वेलवेट

दिग्दर्शक अनुराग कश्यपचा हा महत्त्वाकांक्षी चित्रपट तिकीटबारीवर अपयशी ठरला असला, तरी तो चांगला चित्रपट आहे. रणबीर कपूर, अनुष्का शर्माच्या या चित्रपटात 60 च्या दशकातील मुंबई दाखवली होती. चित्रपटाचे बजेट 120 कोटी होते आणि त्यातील बराचसा भाग सेट बनविण्यावर खर्च केला गेला होता. त्या काळातील मुंबई दाखविणारा हा सेट उभारण्यासाठी कारागिरांना 11 महिन्यांचा कालावधी लागला होता.

कलंक

करण जोहर निर्माता असलेल्या या चित्रपटाचे सेटस्ही खूप आकर्षक आणि खर्चिक होते. आलिया भट्ट, वरुण धवन, सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त, माधुरी दीक्षित यांच्या या चित्रपटात भूमिका होत्या. या चित्रपटाच्या सेटवर 15 कोटी रुपये खर्च झाले होते. चित्रपटाचे बजेट 130 कोटी रुपये होते.

भारत

दक्षिण कोरियन चित्रपट ‘ओड टू माय फादर’या चित्रपटावरून प्रेरित असलेल्या सलमान खानच्या ‘भारत’चा सेट बनविण्यासाठी अनेक महिने लागले होते. या सेटसाठी 15 कोटी रुपये खर्च आला होता. या चित्रपटाचे बजेट 100 कोटी होते.

बाहुबली

भारतात ‘बाहुबली’ चित्रपट न पाहणारे खूप कमी लोक असावेत. या चित्रपटातील सेट सर्वांच्याच पसंतीस उतरले होते. हा सेट बनविण्यासाठी 35 कोटी रुपये खर्च आला होता. 500 कारागिरांनी दिवसरात्र राबून 50 दिवसांत हा सेट उभारला होता. त्याआधी आर्टिस्टकडून 1500 स्केचेस बनवण्यात आले होते. त्यानंतर हा सेट
बनवला होता. तसेच भल्लाळदेव
याची विशाल मूर्ती फायबर पासून बनवली होती आणि त्यासाठी 200 कामगार एक महिना काम करत होते.

Back to top button