रिमेकचा सिलसिला दिलीपकुमार यांच्या ‘राम और श्याम’पासून… | पुढारी

रिमेकचा सिलसिला दिलीपकुमार यांच्या ‘राम और श्याम’पासून...

गेल्या काही वर्षांत बॉलीवूडमध्ये दक्षिण भारतीय चित्रपटांच्या रिमेकचे अक्षरशः पेव फुटले आहे; पण दक्षिण भारतीय चित्रपटांच्या रिमेकचा हा ट्रेंड आताचा किंवा अलीकडच्या काळातला नाही, तर अगदी हिंदी चित्रपटातून 70 च्या दशकापासून हा ट्रेंड चालत आला आहे. अभिनेता दिलीपकुमार यांचा ‘राम और श्याम’हा हिंदीतला पहिला रिमेक होता. तेलगू चित्रपट ‘रामुडू भीमुडू’वरून हा चित्रपट बनवला होता.

सलमानच्या करिअरला रिमेकनेच दिला हात

1990 च्या दशकात बॉलीवूडमध्ये रोमँटिक एरा सुरू होता आणि तेव्हा काही खरेच चांगले रोमँटिक चित्रपट आले देखील; पण याच काळात आलेला सलमान खानचा ‘जुडवा’हा मूळच्या नागार्जुनच्या तेलगू ‘हॅलो ब्रदर’चा रिमेक होता आणि तो चित्रपटही जॅकी चॅनच्या ‘ट्विन ड्रॅगन’वरून घेतला होता. ‘तेरे नाम’ आणि ‘वाँटेड’या रिमेकमुळे सलमानचे करिअर सावरले गेले. त्यानंतर सलमानने ‘रेडी’, ‘किक’ असे रिमेक केले.

‘हेराफेरी’ (रामजी राव), ‘गरम मसाला’, ‘हलचल’, ‘भागमभाग’, ‘दे दना दन’, ‘चुप चुप के’ हे सर्व कॉमेडी चित्रपटदेखील मूळ दक्षिण भारतीय भाषेतील चित्रपटांचे रिमेकच होते. ‘साथिया’देखील मूळचा दाक्षिणात्य चित्रपट आहे.

रणवीर सिंगचा ‘सिंबा’हा ज्युनिअर एनटीआरच्या ‘टेम्पर’चा रिमेक आहे. जान्हवी कपूरचा ‘गुड लक जेरी’ मूळ नयनताराच्या चित्रपटाचा रिमेक आहे. राजकुमार रावचा ‘हिट’, शाहीद कपूरचा ‘जर्सी’, श्रद्धा कपूरचा ‘ओके जानू’देखील रिमेकच होते. अर्थात, ‘पोलिसगिरी’, ‘हंगामा 2’, ‘लक्ष्मी’, ‘जय हो’, ‘रन’ असे रिमेक अपयशीही ठरले.

‘गझनी’ने निर्माण केला हंड्रेड करोड क्लब

रिमेकच्या ट्रेंडमध्ये सर्वात मोठी झेप घेतली आमिर खानच्या ‘गझनी’ने. बॉक्स ऑफिसवर 100 कोटी कमवणारा ‘गझनी’हा पहिला चित्रपट होता.

आगामी काळात येणारे रिमेक

शहदाजा (अला वैकुंठपुरमुलु), विक्रम वेधा, सिंड्रेला (रतसासन), भोला (कैथी), कभी ईद कभी दिवाली (वीरम), सेल्फी (ड्रायव्हिंग लायसन्स), मिली (हेलन) यासह फॉरेन्सिक, मास्टर, अपरिचित, थडम, यू टर्न, द़ृश्यम 2, अरूवी, सोराराई पोटरू, कोमली या चित्रपटांचेही हिंदी रिमेक येत आहेत.

Back to top button