

न्यूयॉर्क : सोशल मीडियामुळे जग अधिकच जवळ आले आहे हे खरेच. त्यामुळेच कोणत्याही देशाच्या खेड्या-पाड्यातील व्यक्तीही अचानक जगाचे लक्ष वेधून घेऊ शकते. आता अशाच एका ढोलवादकाने प्रसिद्ध पॉपस्टार जस्टिन बीबरचेही लक्ष वेधून घेतले आहे. देवीच्या जागरणात ढोल वाजवणारी ही व्यक्ती आपले पोट सुटलेले असले तरी पायात स्प्रिंग असल्यासारखी उड्या मारून ढोल वाजवत होती. त्याचा एक व्हिडीओ जस्टिनने आपल्या अकाऊंटवर शेअर केला आहे.
या व्हिडीओत दिसते की मातेच्या जागरणाचा कार्यक्रम सुरू आहे आणि समोर स्त्री-पुरुष भक्त बसलेले किंवा भजनाच्या तालात नृत्य करीत आहेत. यामध्ये ही ढोल वाजवणारी व्यक्ती सर्वांचे लक्ष वेधून घेते. त्याची ढोल वाजवण्याची 'स्टाईल'च वेगळी आहे. तो सुरुवातीला काही उड्या मारत ढोल वाजवतो व नंतर सामान्य रितीने ढोलवादन करू लागतो. जस्टिनने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने आपला मित्र आणि ड्रमर डेव्हन टेलरला टॅगही केले आहे. 'मी तुझ्याकडून अशा कार्यक्रमाची अपेक्षा ठेवतो' असे त्याने म्हटले आहे! हा व्हिडीओ आतापर्यंत 20.4 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसेच त्याला 9 लाखांपेक्षा अधिक लाईक्स मिळालेले आहेत.