Ajay Devgan : तिन्ही खानांना टक्कर देत अजय देवगण याने तिसऱ्यांदा पटकावला राष्ट्रीय पुरस्कार | पुढारी

Ajay Devgan : तिन्ही खानांना टक्कर देत अजय देवगण याने तिसऱ्यांदा पटकावला राष्ट्रीय पुरस्कार

पुढारी ऑनलाईन डेस्क : ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची शुक्रवारी (दि. २२ जुलै) घोषणा करण्यात आली. या पुरस्कारांमध्ये ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटास सर्वात लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार प्राप्त झाला. तर याच चित्रपटात तान्हाजी ही मुख्य भूमिका साकारणा-या अजय देवगण (Ajay Devgan) याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुस्कार जाहीर झाला. तान्हाजीच्या निमित्ताने बॉलिवूडच्या सिंघमने पुन्हा एकदा राष्ट्रीय पुरस्कारास गवसणी घातली. अनेक दिवसांनी या चित्रपटाद्वारे अजयने पुन्हा एकदा आपले स्टारडम आणि अभिनयातली कौशल्य अबाधित असल्याचे दाखवून दिले आहे.

बॉलिवूडमधील तिन्ही खानांना दिली टशन (Ajay Devgan)

बॉलीवूडमध्ये खान यांचे राज्य असल्याचे म्हटले जाते. शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांनी अगदी ९० च्या दशकापासून या बॉलिवूडवर एकहाती दबदबा निर्माण केला. तरी देखिल यांना समकालीन असणारा तसेच यांच्या सोबतच स्वत:चे करिअर सुरु करणारा अजय देवगण याने बॉलिवूडमध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. तसेच स्वत:ची अशी फॅनफॉलोईंग सुद्धा निर्माण केली. सुरुवातीला ॲक्शन हिरो म्हणून नाव कमावलेल्या अजयने नंतर रोमॅन्टीक आणि गंभीर भूमिका करु शकतो हे देखिल दाखूवन दिले. त्यानंतर त्याने त्याच्या गोलमाल सारख्या विनोदी चित्रपटातून आपण एक चांगला सेन्स ऑफ ह्युमर असणारे विनोदी व्यक्तीरेखा सुद्धा तितक्याच कौशल्याने आणि ताकदीने वठवू शकतो हे देखिल दाखवून दिले. अशा प्रकारे त्याने आपण एक अष्टपैलू कलाकार असल्याचे दाखवून दिले.

अभिनेता ते दिग्दर्शक असा प्रवास (Ajay Devgan)

‘फूल और काँटे’ या चित्रपटापासून आपल्या अभिनायाच्या कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या अजय देवगण याने बॉलिवूडमध्ये १०० हून अधिक चित्रपट करण्याचा बहुमान मिळवला आहे. हा बहुमान तिन्ही खानांकडे नाही हे विशेष. अभिनयासह त्याने कालांतराने चित्रपट निर्माता आणि चित्रपट दिग्दर्शक अशी देखिल स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्याने निर्माता म्हणून अनेक चांगल्या चित्रपटांची निर्मितीतर केलीच आहे. तसेच ‘यु मी और हम’, शिवाय व नुकताच आलेला रण वे हे चित्रपट त्याने दिग्दर्शित केले आहेत. तर भोला नावाचा आगामी चित्रपट तो दिग्दर्शित करित आहे.

अभिनयाचा उमठवला ठसा (Ajay Devgan)

अजय देवगन याने अनेक हिट सिनेमे दिले आहेत. त्याचा पहिलाच चित्रपट ‘फूल और काँटे’ हिट ठरला होता. त्यांनतर त्याने जिगर, विजय पथ, दिलवाले, सुहाग, हकीकत, दिलजले, जान, इश्क, प्यार तो होना ही था, होगी प्यार की जीत, हिंदुस्तान की कसम, गंगाजल, अपहरण, गोलमाल, दृश्यम, सिंघम असे अनेक सुपर डुपर हिट सिनेमे त्याने दिले आहे. गंगाजल, अपहरण, राजनिती सारख्या चित्रपटात त्याने दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या सोबत अनेक संवेदनशील आणि सामाजिक आशयाचे चित्रपट दिले. तसेच त्याने दिग्दर्शक रोहित शेट्टी सोबत गोलमाल सारखी विनोदी चित्रपटांची मालिका दिली. तसेच रोहित शेट्टी सोबत सिंघम या चित्रपटांची देखिल मालिका त्याने दिली आहे.

ॲक्शन, ड्रामा, ट्रॅजिडी आणि कॉमेडी अशा सर्व रंगात आणि ढंगात त्याने तमाम प्रेक्षकांचे व आपल्या चाहत्याची मने जिंकली आहेत. या त्याच्या अभिनय कौशल्याची दखल म्हणून १९९८ साली जख्म या चित्रपटासाठी त्याला पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर ‘द लेंजड ऑफ भगतसिंग’ या चित्रपटासाठी २००२ साली त्याला दुसरा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आता त्याने तान्हाजी चित्रपटाद्वारे तिसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कारास गवसणी घातली आहे. बालिवूडमध्ये स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करत गेली ३० वर्षे आपला दबदबा अबाधित ठेऊन अभिनायत अशी उतुंग भरारी घेणं क्वचितच एखाद्या अभिनेत्यास जमले असेल.

Back to top button