भुपिंदर सिंग यांच्या निधनाने अनुपम खेर भावूक | पुढारी

भुपिंदर सिंग यांच्या निधनाने अनुपम खेर भावूक

पुढारी ऑनलाईन डेस्क : खर्जातील धीरगंभीर आवाजाच्या बळावर उडत्या चालींच्या गाण्यांसह गझल गायकीतही स्वत:ची ओळख निर्माण करणारे गायक भुपिंदर सिंग यांचे निधन झाले. दीर्घ आजारपणाने ग्रासलेले भुपिंदरजी ८२ वर्षांचे होते. या महान गायकाला आदरांजली वाहताना अनुपम खेर यांनी आतिशय भावनिक पोस्ट लिहिली आहे.

कलेच्या क्षेत्रात संघर्ष कुठल्याच कलावंताला चुकला नाही. त्यातही अभिनयाचे क्षेत्र तर अत्यंत बेभरवशाचे आहे. आपल्या याच संघर्षाच्या काळाला उजाळा देत अनुपम खेर या दिग्गज अभिनेत्याने भुपिंदर सिंग या दिग्गज गायकाला श्रद्धांजली वाहिली आहे. भुपिंदर यांच्या दोन गाण्यांशी जोडलेल्या हळव्या आठवणी खेर यांनी सोशल मीडिया ‘कू’वर पोस्ट करत सांगितल्या आहेत.

खेर लिहितात, “प्रसिद्ध गायक भूपेंद्र सिंह यांच्या निधनाविषयी ऐकून खूप दु:ख झाले. त्यांची सगळीच गाणी मला आवडतात. पण “एकअकेला इस शहर में… आणि दिल ढूंढता है…” या दोन गीतांनी मुंबईतल्या सुरुवातीच्या काळात काम शोधताना मला सतत बळ दिलं. खूप साध्या स्वभावाचे होते भुपिंदरजी! ओम् शांती!🕉”

प्लेबॅक सिंगर आणि गझलगायक म्हणून नावाजले गेलेल्या भुपिंदर यांनी गायलेलं पहिलं गाणं होतं, ते ‘हकीकत’ सिनेमामधलं ‘होके मजबूर मुझे उसने भुलाया होगा…’ बॉलिवूडला एक नवा उबदार, मधाळ आवाज मिळाला. त्यानंतर एकाहून एक सुरेख गाण्यांमधून भुपिंदर यांनी भावनांना सुरांचा साज चढवला. ‘मेरे घर आना जिंदगी…’, ‘किसी नजर को तेरा…’, ‘आज बिछडे है…’, ‘मेरा रंग दे बसंती चोला…’ ही त्यातली काही उल्लेखनीय.

१९४० साली पंजाबच्या अमृतसरमध्ये जन्मलेले भुपिंदर सिंग गायक म्हणून लोकप्रिय झालेच. पण ते कसलेले गिटारवादकही होते. ‘दम मारो दम’सारख्या तुफान गाजलेल्या गाण्यांमधली गिटारची जादू होती भुपिंदर यांची! जगभरातले संगीतप्रेमी या प्रतिभावंताच्या निधनामुळे शोक व्यक्त करत आहेत.

Koo App

Back to top button