Muramba : मुरांबा मालिकेत बरसणार प्रेमाचा पाऊस | पुढारी

Muramba : मुरांबा मालिकेत बरसणार प्रेमाचा पाऊस

पुढारी ऑनलाईन डेस्क :
त्याला पाऊस आवडत नाही, तिला पाऊस आवडतो…
ढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो…
मी तुला आवडते पण पाऊस आवडत नाही,
असलं तुझ गणित खरच मला कळत नाही…
पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते…
पावसासकट आवडावी ती म्हणूण ती ही झगडते…
रूसून मग ती निघून जाते भिजत राहते पावसात…
त्याचं तिचं भांडण असं ओल्याचिंब दिवसात…

कवी सौमित्र यांच्या या ओळी रमा आणि अक्षयमधल्या बहरणाऱ्या नात्यासाठी अगदी चपखल बसतात. दोघांमधल्या प्रेमाचा आंबट गोड मुरांबा आता मुरायला लागलाय. रमाच्या अवखळ आणि निरागस स्वभावाने अक्षयला तिच्या प्रेमात पडायला भाग पाडलच. प्रेमाच्या या नात्याची गोड सुरुवात वरुणराजाच्या हजेरीने होणार आहे. मुकादम कुटुंब पिकनिकसाठी निघालं आहे. पावसात पिकनिकचा आनंद काही औरच. अश्यातच पाऊस सुरु होतो आणि पावसात भिजण्याचा मोह रमाला काही आवरत नाही. अक्षयला पावसात भिजायला आवडत नाही. मात्र रमावरच्या प्रेमापोटी अक्षयही पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटणार आहे.

येत्या रविवारी म्हणजेच १० जुलैला दुपारी २ आणि सायंकाळी ७ वाजता हा खास भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक आव्हानांचा सामना करत मुरांबा मालिकेच्या संपूर्ण टीमने या खास भागाचं शूटिंग पूर्ण केलं.

अक्षय मुकादम ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या शशांक केतकरसाठी तर हा सीन खूपच स्पेशल आहे. कारण या सीनच्या निमित्ताने पावसात भिजण्याचा आनंद त्याला लुटता आला. पाऊस म्हटलं की गरमागरम भजी आलीच. त्यामुळे संपूर्ण टीमने मिळून गरमागरम चहा आणि कांदाभजीचा आस्वाद घेतला.

मुकादम कुटुंबाच्या पिकनिकचा हा सीन मढमधल्या एका खास लोकेशनवर करण्यात आला. शशांक केतकरला हे लोकेशन इतकं आवडलं की पुन्हा पुन्हा इथे सीन व्हावेत अशी इच्छा त्याने व्यक्त केली. त्यामुळे शूटिंगच्या निमित्ताने का होईना संपूर्ण मुकादम कुटुंबाने पिकनिकचा आनंद लुटला.

Back to top button